#NCB - ती लेडी डॉन कोण? नवाब मलिक यांचा NCBवर निशाणा

Update: 2021-10-16 07:48 GMT

NCB ने आर्यन खानवर केलेल्या कारवाईनंतर राजकीय आरोप प्रत्योराप सुरू झालेले असताना, आता अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा NCBच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून NCBच्या कारवायांबाबत पत्रकार परिषद गेऊन नवाब मलिक आरोप करत होते. पण आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आरोप केले आहेत.

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांचा उल्लेख केला आहे. मलिक यांनी ट्वीटरवर फ्लेचर पटेलसोबतचे समीर वानखेडे यांचे फोटोसुद्धा प्रसिद्ध केले आहेत. तर दुसऱ्या आणखी एका ट्विटमध्ये फ्लेचर पटेल आणि महिलेचा फोटो प्रसिद्ध केला आहे. लेडी डॉन असा या महिलेचा उल्लेख आहे.  

फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा NCB ने करावा आणि समीर वानखेडेंशी पटेल यांचा काय संबंध आहे, त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो का टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग का करत आहेत, समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांचा काय संबंध आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे फ्लेचर पटेलच्या प्रसिद्धीकरीता कार्यक्रम आयोजित करत असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी NCBच्या कारवाईवर आक्षेप घेत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. कोणत्याही कारवाईमध्ये ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आसपासच्या लोकांना बोलावून पंचनामा करण्याची कायदेशीर तरतूद आहे. NCBच्या तीन कारवायांमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचे नाव आहे. याचाच अर्थ कारवाई ठरवून केली असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. फ्लेचर पटेल हे ३ प्रकरणांमध्ये स्वतंत्र पंच कसे झाले याचे उत्तर द्या अशी मागणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना केली आहे.

Tags:    

Similar News