नवज्योत सिंग सिद्धूंनी व्हिडिओ जारी करुन सांगितले राजीनाम्याचे कारण

Update: 2021-09-29 07:47 GMT

पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला. यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सिद्धू यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण जाहीर केलेले नाही. पण यामुळे पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद गंभीर वळणावर पोहोचल्याचे उघड झाले आहे. सिद्धू यांच्या पाठोपाठ रझिया सुलताना यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे पंजाबमधील राजकीय गोंधळ तर आणखी वाढला आहे. यासर्व गोंधळाच्या परिस्थितीवर नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीटरवरुन स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, आपला १७ वर्षांचा राजकीय प्रवास एका हेतूने होता. पंजाबच्या लोकांचं जीवनमान सुधारणें आणि राजकारणात एखाद्या मुद्द्यावर भूमिका घेऊन ठामपणे उभं राहणे हाच आपण धर्म मानला. आपण नेहमीच पंजाबच्या जनतेच्या भल्यासाठी लढत राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वडिलांनी आपल्याला नेहमीच सत्याच्या मार्गावर चालायला शिकवलं आहे, त्यामुळे आपण कधीही तत्वांशी तडजोड करणार नाही आणि नैतिकतेशी तडजोड करणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे.

पण पंजाबमध्ये सध्या जनतेच्या समस्या आणि योग्य धोरणांशी तडजोड केली जात असल्याचं मला दिसते आहे, आपण हायकमांडला फसवू शकत नाही किंवा त्यांची फसवणूकदेखील होतानना पाहू शकत नाही, असे सिद्धू यांनी आपल्या या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना ज्यांनी क्लीनचिट दिली त्यांच्यावरच पुन्हा जबाबदारी सोपवली गेल्याचे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. पण आपण काँग्रेसचेच काम करत राहणार असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News