देश समृद्ध होत असताना सुद्धा काही लोक निराशेच्या गर्तेत...नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला...
कठीण काळात आपला देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असताना सुद्धा काही जणांना याचा त्रास होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या कारभारावर तोशेरे ओढत, विरोधकांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मोदींच्या भाषणाची सुरवात जय श्री रामच्या घोषणांनी झाली. आज भारताच्या समृद्धीमध्ये जग आपली समृद्धी पाहत आहे.. निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आपल्या देशाची प्रगती पाहूच शकत नाहीत आणि सहन करु शकत नाहीत. भारताच्या १४० कोटी लोकांच्या शक्तीमुळेच आज देशाचा डंका जगभरात वाजतो आहे. गेल्या ९ वर्षात ९० हजार स्टार्ट अप सुरु झाले आहेत. स्टार्ट अप विश्वात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आज भारत जगभरात मोबाईलच्या निर्मितीतला दुसरा देश आहे. डोमेस्टिक विमान प्रवासाच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. या सगळ्या बाबी आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत. यात माझ्या मनात काहीही शंका नसल्याचे मोदी यांनी यावेळी सभागृहात सांगितले. आपल्या देशातल्या प्रत्येक क्षेत्रात मला आशा आणि स्वप्न दिसत आहेत. आपली स्वप्न आणि संकल्प घेऊन लोक पुढे जात आहेत. मात्र लोकसभेतील काहीजण निराशेच्या गर्तेत बुडाल्याचे पाहायला मिळत आहेत. आणि ही निराशा अशीच आलेली नाही तर यामागे कारण आहे आणि ते कारण म्हणजे आम्हाला जनतेने इथे बसवले आहे तेही एकदा नाही तर दोनवेळा...त्यामुळे विरोधक निराशेच्या गर्तेत बुडालेले दिसत आहेत.
आज भारतात एक स्थिर सरकार आहे. जे गेल्या ९ वर्षापासून देशाचा कारभार सुरळीतपणे चालवत आहेत. अनेक वर्ष भारतात राजकीय गोंधळ नाही. राष्ट्रहिताचे निर्णय घेणारे आपले सरकार आहे. आपल्या देशातले बदल हे सक्तीने होत नाहीत. तर काळाची गरज आहे म्हणून होत आहेत. असे मोदी यांनी यावेळी सभागृहात विरोधकांना सांगितले. करोना काळात मेड इन इंडिया लस तयार झाली. भारताने जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. आपल्या देशाने १५० पेक्षा जास्त देशांना औषधे पोहचवली. लस पोहचवली. जगातील अनेक देश असे आहेत ज्यांनी भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. करोना काळात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली. एक काळ होता की, भारताला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाट पाहावी लागत असे. मात्र गेल्या ९ वर्षाच्या कालखंडात अनेक बदल झाले आहेत. आणि आज भारत टेक्नॉलॉजीच्याबाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. अनेकांना मी काय म्हणतो हे समजण्यासाठी थोडा वेळ लागतो, असा टोला विरोधकांना मोदी यांनी लगावला.
कोरोना काळात अनेक देशांमध्ये मोठमोठी संकटे आली. कुठे अन्न-धान्याचा प्रश्न निर्माण झाला. तर कुठे महागाई वाढली. अशा सर्व संकटातही आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. जी-२० समुदायाचे अध्यक्षपद आपल्याला मिळाले आहे, ही देखील आपल्या देशासाठी गौरवाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणादरम्यान काही टीका करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका मोठ्या नेत्याने त्यांचा अपमानही केला, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. राहुल गांधी यांचे नाव न घेता नरेंद्र मोदी यांनी 'यह कह कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वह अब आ रहे है' असा टोला लगावला. दरम्यान आव्हानांशिवाय आयुष्य नाही, मात्र आव्हानांपेक्षा जास्त सामर्थ्यवान १४० कोटी जनतेचे सामर्थ्य आहे. आव्हानांपेक्षा त्यांचे धैर्य, साहस मोठे आहे. कठीण काळ, युद्धजन्य परिस्थिती, अनेक देशात आलेली असताना भारत आजही खंबीरपणे जगाच्या अर्थव्यवस्थेत आपले पाय घट्टपणे रोवून उभा आहे. असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.