नारायण राणे यांच्या चांगुलपणाचा कोण फायदा घेतंय?

माझ्या चांगुलपणाचा, मैत्री फायदा घेतलाय असं नारायण राणे का म्हणतायेत? देवेंद्र फडणवीस यांच्यावर राणे का नाराज आहेत? राणेच्या आभार पोस्टरवर फक्त मोदींचा फोटो का? तसेच राणेंचं बेताल वक्तव्य भाजपाची प्रतिमा मलिन करतेय का? जाणून घेण्यासाठी वाचा हा स्पेशल रिपोर्ट;

Update: 2021-08-28 13:34 GMT

नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्याने राजकारणापासून काहीशे दूर झालेले नारायण राणे माध्यमांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. कोणतंही वृत्तपत्र पाहिलं की नारायण राणे यांची बातमी आपल्याला हमखास वाचायला मिळत आहे.

खरं तर राणे यांची महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रा सुरु झाल्यानंतर राणेंची माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या यात्रेत राणे यांची शिवसेनेविरोधात जोरदार बॅटींग सुरु आहे. किंबहूना राणे यांची ही यात्रा शिवसेनेविरोधात बॅटींगसाठीच आहे. असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मात्र, राणे यांची ही यात्रा ऐन जोशात सुरु असताना राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना घसरले...

मुख्यमंत्र्यांच्या कानामागे देण्याची भाषा राणे यांनी केली. आणि राणेंना कात्रीत पकडण्याचा मौका पाहणाऱ्या शिवसेनेने मौका देखकर चौका मारला. राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, तरीही राणे राज्याच्या राजकारणाच्या केंद्र स्थानी कायम राहिले. या सर्व घडामोडींमध्ये महाराष्ट्र भाजप चा चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस कुठं होते. राणे महाराष्ट्रात आले आणि देवेंद्र फडणवीस यांची माध्यमांमधील जागा राणे यांनी घेतली. असं चित्र निर्माण झालं.

मात्र, राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर महाराडा सुरु झाला. या सगळ्यात राणे यांच्या विरोधात सुरु असलेल्या या वादावर बोलण्य़ासाठी फडणवीस यांना समोर यावं लागलं. मात्र, फडणवीस यांनी राणेंच्या त्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही. दुसरीकडे राणे मी चुकीचं बोललो नाही. असं सांगत होते. फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवर नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन घेईल असं उपहासात्मक उत्तर दिलं. यावरून राणे फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याचं दिसून आलं.

देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यातील दुरावा राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर तीव्र स्वरुपात समोर आला. राणे यांच्या अटक सत्रात त्यांना समर्थन दिलं म्हणून आभार व्यक्त करणारे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरवर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नारायण राणे यांचेच फोटो होते. यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस नाही. या पोस्टरमधून राणेंनी फडणवीस यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय.. यावरून राणे फडणवीस यांच्यावर नाराज आहेत का? हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतो.

काही जण माझ्या चांगुलपणाचा मैत्रीचा फायदा उठवतात हे ही माझ्या आता लक्षात आलं आहे. असं नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. मात्र, खरंच राणेंच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातोय का? या संदर्भात राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्याशी आम्ही बातचीत केली... ते म्हणतात...

राणेंचा हा चांगुलपणा नसून मुर्खपणा आहे. आणि नारायण राणेंचा फायदा कुणी घेत नसून राणे दुसऱ्यांचा फायदा घेत आहेत. राणेंचा जर कुणी फायदा घेत असेल तर मोदी, अमित शाह आणि भाजप घेत असतील. भाजपाला उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बोलणारी माणसं हवीत. त्यामुळे राणे यांना केंद्रात स्थान मिळालं आहे. महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर शिवसेना सत्तेत असल्यामुळे आक्रमपणाने वागत नाही. परंतु राणेंच्या वक्तव्यानंतर सेनेला पुर्नजीवन मिळालं आहे. राणे जी भाषा बोलतायेत ती भाषा भाजपाची संस्कृतीच नाही. केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर राणेंनी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना दुय्यम दर्जाचं स्थान दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत दिसत नाही.

पोस्टरबाजीसंदर्भात सांगायचं झालं तर, राणेंनी भाजपा लवकरच आत्मसात केल्याचं पाहायला मिळतेय. कारण आभार मानणारी जी पोस्टर आहेत त्यावर फक्त मोदी आणि राणेच आहेत, त्यामुळे भाजपात फक्त नेता एकच आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि बाकी सगळे कार्यकर्ते आहेत. हे गणित राणेंना चांगलचं उमजलेलं पाहायला मिळतेय...

दरम्यान, सामान्य कार्यकर्त्यांना राणेंबद्दल काय वाटतंय या संदर्भात काही राणे समर्थकांशी बातचीत केली असता राणे यांच्या विधाना चुकीचा अर्थ काढला जातोय आणि त्यांच्या चांगुलपणाचा फायदा राज्यातले सरकार घेत आहे. त्यांना केंद्रीय पद मिळाल्या मुळे शिवसेना अस करत आहे. परंतु कुणी काही केलं तरी राणे यांचा फायदा त्यांना घेता येणार नाही असं राणे समर्थकांनी म्हटलं आहे.

राणेंच्या या वक्तव्यावर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यांशी बातचीत केली.

देसाई सांगतात की, नारायण राणे यांच्यामध्ये चांगुलपणा असल्याचं मला तरी वाटत नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सामान्यत: अभ्यापूर्वक, संयमी बोलणं जे आहे त्याला विसंगत असं राणे यांचे वक्तव्य आहे. हे भाजपाच्या विचारांशीही सुसंगत नव्हतं. राणे हे शिस्त, संयमी आणि मोठ्या पक्षात कसे वागावे लागते त्यापैकी नाहीत.

त्यामुळे आज सिंधुर्दुग जिल्ह्यामध्ये राणेंनी आभार व्यक्त करणारी जी पोस्टर, बॅनर लावली आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस कुठेच नाहीत. राणेंची पोस्टरबाजी हे आभार आणि जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी लावले आहेत. आणि राणेंचं असचं वर्तन राहिलं तर त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांची जागा दाखवून देईल. राणेंचा उपयोग करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून देतील. राणेंना मोदी आणि शहाचा फोन आला. हे प्रमोद जठार जरी सांगत असतील तरी तो फोन राणेंची कानउघडणी करण्यासाठी आला असू शकतो. असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केलं आहे.

एकंदरीत राणे यांचा चांगुलपणाचा कोणीही फायदा घेतला नसल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. राणे यांचं वर्तन असंच राहिलं तर पक्ष राणे यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Full View
Tags:    

Similar News