सरकार पडण्याच्या भीतीने मंदिरं सुरू करण्यास टाळाटाळ, नारायण राणेंचा टोला
मंदिरे सुरू असो वा बंद आम्हाला गणपती पावतो असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. नारायण राणे यांच्या कोकण जनआशीर्वाद यात्रेला पालीमधील बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुरूवात जाली. "राज्य सरकारला मंदिरे सुरू करायला भीती वाटते, मंदिरे सुरू केली आणि यांचे सरकार पडायचे, आम्हाला मंदिरे सुरू असो वा बंद गणपती पावतो" असा टोला राणेंनी लगावला आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारावर सतत बोलणार असे राणे यावेळी म्हणाले. कोकणातील नगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वत्र भाजपचे साम्राज्य असेल इतर पक्षांना स्थान मिळणार नाही, असाही दावा नारायण राणे यांनी केला आहे.
राणेंची जनआशीर्वादयात्रा मुंबई ते सिंधुदुर्ग अशी सुरू आहे. १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट याकाळात यात्रा सुरू राहणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कोकण जन आशीर्वाद यात्रेला हिरवा कंदील दाखवला. यावेळी बल्लाळेश्वर मंदिर ते पालीतील शिवस्मारक अशी भव्य रॅली काढण्यात आली. जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका सुरू ठेवली आहे.