राणे, अटक आणि राजकारण
नारायण राणे यांना झालेली अटक आणि सुटका हे राणेंच्या आक्रमक शैलीचा परिणाम आहे का? नारायण राणे यांना या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळणार का? राणे यांच्यावर निशाणा साधून उद्धव ठाकरे यांनी काय साध्य केलं? वाचा… अजित अनुषशी यांचे विश्लेषण;
राणेंच्या अटकेने महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघालेला आहे. नारायण तातू राणे, हा माणूस एक भन्नाट रसायन आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सामनाने 'महाराष्ट्राचे एनटीआर' अशी हेडलाईन दिल्याचं आठवतंय.
कोकणावर विकासाची पहिलीवहिली लाट वाहून गेली, त्यामागचं मोठं श्रेय राणेंचंच. शिवसेनेत संघटन आणि प्रशासन या दोन्हीवर उत्तम पक्कड, उद्योगवर्गाशी चांगले संबंध आणि जनसमुदायात लोकप्रियता असं दुर्मिळ कॉम्बिनेशन राणेंकडे होतं.
पण पूढे गडबड ही झाली की पुन्हा मुख्यमंत्री बनणं, या कल्पनेने राणेंना झपाटलं. त्यापायी एकीकडे उद्धव ठाकरेंशी शत्रूत्त्व ओढवून घेताना, दुसरीकडे काँग्रेसमध्येही त्यांना धड जम बसवता आला नाही. आताच्या नाट्यातही राज्यातल्या भाजप नेतृत्त्वाला आव्हान देण्याची गणितं नसतीलच, असं सांगता येत नाही. तशात स्फोटक बोलण्याच्या सवयीने आणखी गोत्यात येत गेले.
या आतुरतेला नंतर पुत्रप्रेमाची जोड मिळाली आणि त्यांची झपाट्याने अधोगती झाली. कोकणात उभं राहू पाहणारं एक राज्यव्यापी नेतृत्त्व जिल्ह्यात आव्हान टिकवायला धडपडायला लागलं.
दुसरीकडे या अटकेतून उध्दव यांनी पुन्हा आपली मुत्सद्देगिरी दाखवून दिलेली आहे. बाळासाहेबांची स्टाईल मुलूखमैदान तोफेची, तर उद्धव शांतपणे बंदुकीच्या निशाण्यावर सावज आणून टिपतात, हे अर्णबपासून अनेक बाबतीत त्यांनी पुन्हापुन्हा दाखवलेलं आहे.
सध्याच्या यात्रेत अनेक एफआयआर दाखल झालेले असले, तरी मुख्यमंत्री तोपर्यंत थांबले, जोपर्यंत राणेंनी असं विधान केलं नाही, जे भाजपला डिफेंड करता येत नाहीये…
पण तिसरा कोन तोच आहे. भाजपला राणेंना जोरात पाठिंबा द्यायचा आहे का? का राणे राज्यात फडणवीसांना पर्याय वाटावे अशी 'हायकमांड'ची इच्छा आहे? फडणवीस किती ताकदीने राणेंसाठी उभे राहतील? या प्रकारात भाजप गोटात राणे मोठे होणं, फडनवीसांना असुरक्षित बनवतं का? असे अनेक गूढ प्रश्न यात आहेत…
आणि दरम्यान अनेक वर्षं इमानेइतबारे संघावर विश्वास ठेवणाऱ्या (उरलेल्या) काही जुन्या कार्यकत्यांना मात्र राणेंच्या बाजूने दंड उचलायचा आहे.
जय हो!
(लेखक : अजित अनुषशी हे Chartered Accountants आहेत)