"तुम्ही कोल्हापुरातून कोथरूडला आले आम्ही काही बोललो का?" संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
“तुम्ही कोल्हापुरातून कोथरूडला आले आम्ही काही बोललो का?” असं खा. संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.;
मुंबई : "जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सुरक्षित वॉर्ड मध्ये उभे राहुन निवडून दाखवावं..त्यांनी आपले दंडही चेक करावे आणि आपली क्षमता देखील पाहावी" असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हे व्यक्तव्य केलं होत. त्यांच्या याच वक्तव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरूडला आले आम्ही काही बोललो का? असं म्हटलं आहे.
सोबतच मी काय करावं हा प्रश्न येतोच कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…", असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना डिवचले. भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का? अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. मात्र, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मनसे – भाजप युतीचा सध्या तरी प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान याबाबत माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी चॅलेंज केलं होत.यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.