भाजपा सरकारच्या दडपशाहीला रस्त्यावर उतरुन चोख उत्तर देऊ: नाना पटोले
जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुलजी गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसनं केला आहे.;
काँग्रेस (Congress) खासदार राहुलजी गांधी (RahulGandhi) यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी (Nirav Modi), ललित मोदीसारख्या (Lalit Modi) भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुलजी गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे तसेच मोदी सरकार (Narendra Modi) राहुलजी गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भितीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
राहुलजी गांधी यांच्यावर भाजपा सरकार आकसापोटी कारवाई करत असल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), सुनिल केदार (Sunil Kedar), मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप (Bhai Jagtap), कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा (Charanjit Singh Supra), प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जनतेचे पैसे घेऊन पळालेल्यांवर राहुलजी गांधी यांनी भूमिका घेतली तर त्यांच्यावर खोटे आरोप लावून दबावाखाली कारवाई करण्यात आली. दबावाखाली होत असलेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. ललित मोदी व निरव मोदी यांच्याबद्दल बोलल्यानंतर जर शिक्षा होत असेल तर काँग्रेस पक्ष राज्यभर जेल भरो आंदोलन करुन त्याचा निषेध करेल.
सावरकर यांच्याबद्ल काँग्रेसने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु विरोधी पक्ष जाणीवपूर्वक राहुलजी गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, खा. राहुलजी गांधी यांच्यावर आकसाने व तेही गुजरातमधून कारवाई केली आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्ष वरच्या न्यायालयात धाव घेईलच परंतु राहुलजी गांधी आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता पराभवाची भिती वाटू लागली आहे.
राज्यातील विधान परिषद व विधान सभा पोटनिवडणुकीतही त्याचा प्रत्यय आलेला आहेच. म्हणूनच पराभव दिसू लागल्याने निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाया सुरु आहेत. भाजपाच्या अशा कारवायांविरोधात काँग्रेसही चोख उत्तर देईल. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभर विविध भागात जेल भरो आंदोलन करण्यात आले.