लोकवस्त्यांचे योग्य नियोजन व्हावे असे कोणत्याच सरकारला वाटत नाही-ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान यावेळी त्यांनी महापुराबाबत देखील भाष्य केले आहे.;
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काही महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राज ठाकरेंनी या बैठकीत निवडणूक आणि संघटना बांधणीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सोबतच पुन्हा पंधरा दिवसांनी ठाण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रत्येकजण आपआपल्यापरिने मदत करत आहे. मी, ज्यावेळी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना देखील आवाहन केलं आहे. कोकणातल्या प्रत्येक गावात महाराष्ट्र सैनिक पोहोचला आहे. त्याठिकाणी महाराष्ट्र सैनिकांकडून मदतकार्य केलं जात आहे. पुरग्रस्त गावांचा दौरा करून तेथील मदत आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण करण्याची गरज नाही असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"पूरस्थिती उदभवण्याचे एकमेव कारण म्हणजे, कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही. महापुराची परिस्थिती पहिल्यांदाच घडलेलं नाही. दोन वर्षापुर्वी देखील असचं झालं होतं".त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सोबतच लोकवस्त्या वाढत आहेत , या लोकवस्त्यांचे योग्य नियोजन केले जात नाही ते व्हायला हवे. मात्र, असं कुठल्याही सरकारला वाटत नाही याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. ठाण्याची परिस्थिती पाहिली तर, ठाणे टुमदार शहर होतं, मात्र, आज ठाण्याची काय स्थिती झाली आहे? याकडे लक्ष द्यायला कुठल्याही सरकारला वेळ नाही. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा उदभवणार. या गोष्टी थांबवणं गरजेचं असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.