तुरुंगात असल्यामुळे राज्यसभा (rajyasabha) निवडणूकीत मतदानापासून वंचित असलेल्या नवाब मलिक-अनिल देशमुखांनी ( nabab malik) ( anil deshmukh) विधानपरीषदेच्या मतदानासाठी पुन्हा हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्रीनवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याची याचिका यापूर्वी कोर्टाने फेटाळली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी मागण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. याला ईडीने विरोध केला होता. तर आता विधान परिषदेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना परवानगी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहेत. निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी एक दिवसाचा जामीन देण्यात यावा अशी मागणी मलिक-देशमुख यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. यानंतर पुन्हा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. राज्यसभेसाठी दोघांनाही कोर्टाने परवानगी नाकारली होती.
विधान परिषद निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडीला फटका बसू नये यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका केली आहे. मलिकांची सुधारित याचिका दाखल करण्याच्या परवानगीबाबत थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. तर अनिल देशमुखांच्या याचिकेवर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांनी याचिका दाखल केली असून राज्यसभेसारखा घोळ पुन्हा होऊ नये म्हणून दोन्ही नेत्यांकडून मुदतीपूर्वीच याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे न्यायालयाने आधीच परवानगी द्यावी जेणेकरुन न्यायालयीन कोठडीत असताना विधान भवनात जाऊन मतदान करु असे या याचिकेत म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी नव्याने याचिका नुकतीच सकाळच्या सत्रात कोर्टासमोर आली होती. यामध्ये १५ जून रोजी याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी याचिका करण्याची परवानगी द्यावी अशी याचिका नवाब मलिकांनी केली आहे.
दरम्यान नवाब मलिकांना जर परवानगी मिळाली तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर एकाच दिवशी १५ जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार असल्याने आता निवडणूक अटळ ठरली आहे. एका एका मतासाठी माझं आणि महा विकास आघाडी करून प्रयत्न केले जात असताना तुरुंगातील 2 मते महत्त्वपूर्ण भुमिका ठरवू शकतात.