केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जरा अभ्यास करून बोलावे - राज्यमंत्री तनपुरे

Update: 2021-10-16 11:18 GMT

अहमदनगर :  काही लोकांना निवांत झोप यावी म्हणून ते भाजपमध्ये गेले आहेत आणि असेच लोक आता इतरांच्या बॅलन्स शीटबाबत बोलत आहेत, अशा शब्दात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांना जोरदार प्रत्युत्तर दिला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते, यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं की, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सध्या त्यांचे बॅलन्स शीट तपासण्यात व्यस्त आहेत,त्यांना ते तपासूद्यात त्यानंतर ते जिल्ह्यात येतील अशी टीका खासदार विखे यांनी केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खासदार विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोबतच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे काम अत्यंत चांगला असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे असं तनपुरे म्हणाले.

भाजपने आंदोलनाचा फार्स बंद करावा

दरम्यान भाजपने आंदोलनाचा फार्स केलं आहे, आदल्या दिवशी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या वतीने उपोषण करण्यात आलं. सोबतच 'सकाळचे जेवण करून यायचे आणि दुपारपर्यंतच उपोषण करायचं, निदान लोकभावनेचा आदर करून तरी भाजपने उपोषण करायला हवं होतं' अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी भाजपच्या उपोषण आंदोलनाची खिल्ली उडवली. आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची जाणीव आहे मात्र , भाजपने नाटकी आंदोलन करणं थांबवले पाहीजे असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अभ्यास करून बोलावं

दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी 'राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून कोळसा पुरवठा थांबविण्याची विनंती केली होती' या वक्तव्याबाबत बोलताना हे चुकीचे आहे, राज्य सरकारने अशी विनंती केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अभ्यास करून बोलावे असा सल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

केंद्र सरकार महावितरणचे खासगीकरण करणार असल्याची कुणकुण कानावर आली

दरम्यान केंद्र सरकारकडून महावितरणचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे, मात्र असे झाले तर शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून वीज बिल वसुली 'पठणी' पध्दतीने केली जाईल. सध्या महावितरणकडून कुठेही 'पठाणी' वीज बिल वसुली केली जात नाही. कुणालाही सक्ती केली जात नाही. मात्र, जर महावितरणचे खासगीकरण झाले तर सर्वात जास्त नुकसान हे सर्वसामान्यांचेच होईल. त्यामुळे महावितरणचे काम अतिशय उत्तम सुरू आहे. नागरिकांनी देखील वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे मंत्री तनपुरे यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार लॉकडाऊन केले

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन केल्याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता, याबाबत मंत्री तनपुरे यांना विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या अधिकारांनुसार त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात कोणतेही राजकारण नाही असं म्हटलं आहे.

Tags:    

Similar News