वाघाची मांजर कधी झाली? नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला

Update: 2021-12-28 11:31 GMT

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून विशिष्ट आवाज काढल्याच्या प्रकरण सध्या गाजते आहे. विधिमंडळ परिसरात आमदारांच्या वर्तनाचा मुद्दाही यामुळे चर्चेत आला आहे. त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. मांजरीचा आवाज काढला तर आदित्य ठाकरे यांना राग का आला, असा प्रश्न उपस्थित करत वाघाची मांजर कधी झाली? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

तसेच शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या प्रकरणातही नितेश राणे यांना विनाकारण गोवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करत सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राणे यांनी केला. नितेश राणे यांना अटक करण्यासाठी जेवढी ताकद सरकार लावत आहे, तेवढी अतिरेक्यांना अटक करण्यासाठी लावली होती का, असा सवालही त्यांनी विचारला.

Tags:    

Similar News