'तो' केवळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा 'जावई शोध'-शिंदे

Update: 2021-08-22 06:38 GMT

ठाणे : 'मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार', असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा हा 'जावाईशोध' असल्याचे सांगताना शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा शिवसेनेसोबत अखंड आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा 'जावईशोध' कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोलाही शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भक्कम नेतृत्वाखाली एकाही शिवसैनिकाला कोणाला हलवता येणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या 'जन आशीर्वाद' यात्रेदरम्यान वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले आहेत, त्यांच्या सर्व फाईल मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले होते.

सोबतच एकनाथ शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान त्यांनी केले होते. याबाबत एकनाथ शिंदे यांनी "मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे असे प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असून त्याला खिंडार पाडण्याचे अनेक उद्योग भाजपाकडून अनेकवेळा केले गेले आहेत. असे सांगून शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर अपार विश्वास आहे , मग मी कंटाळण्याचा प्रश्नच येत नाही असं शिंदे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News