पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सातत्याने आरोप करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा सूर बदलला असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा विरोध मावळला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या जबरदस्तीविरोधात ममता बॅनर्जी सरकारने ठराव मंजूर केला. मात्र हा ठराव मंजूर करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली आहे. ममता बॅनर्जी सोमवारी बोलताना म्हणाल्या की, पश्चिम बंगाल राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित अतिरेकामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं वाटत नाही. मात्र या यंत्रणांच्या कथित अतिरेकामागे भाजपमधील एक गट सक्रीय असल्याचे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, सध्याचे केंद्र सरकार हुकूमशाही पध्दतीने वागत आहे. त्यामुळे हा ठराव कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून जो पक्षपातीपणा सुरू आहे, त्याविरोधात हा ठराव आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सध्या देशातील व्यापारी देश सोडून जात आहे. तर सीबीआय सध्या पंतप्रधान कार्यालयाला नाही तर गृहमंत्री कार्यालयाा रिपोर्टिंग करते. त्यामुळे यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असण्याची शक्यता ममता बॅनर्जी यांनी नाकारली. तर दुसरीकडे भाजप नेते निजाम पॅलेस मध्ये जात असल्याची टीका करत या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरामागे भाजपमधील एक गट असल्याची टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारचे कामकाज आणि त्यांच्या पक्षाचे (भाजप) हितसंबंध जुळणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
यावेळी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजप नेत्यांवर निशाणा साधला. काही भाजप नेते केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर आमचं निवडून आलेलं सरकार आहे. मात्र भाजप सपशेल अपयशी ठरल्याने ते केंद्रीय अर्थ मंत्रालय ते तपास यंत्रणा या सर्व माध्यमातून आमचा निधी रोखून धरत आहेत. मात्र भाजपमधील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्या नेत्यांना ईडी, सीबीआय समन्स का काढत नाही? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी विचारला.
मोदींना दिलेल्या क्लीन चीटनंतर काँग्रेसचा ममता बॅनर्जीवर हल्ला
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना क्लीन चीट दिल्याने काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की, ममता बॅनर्जी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देऊन लपाछपीचा खेळ खेळत आहेत. तर श्रीनाते पुढे असेही म्हणाल्या की, केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पानही हालत नाही. पण तुम्ही त्यांना क्लीन चीट देत आहात, पण देश याच मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित करत आहे.
ममता बॅनर्जी यांचा भाजपसोबत समझौता
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, विरोधी गोटात खळबळ माजवून देणे ही बॅनर्जी यांची जुनी युक्ती आहे. सीपीआय(एम) सत्तेत असताना ममता बॅनर्जी यांनी बंगाल सीपीआय (एम) पेक्षा चांगले म्हणत अशाच प्रकारे खेळी केली होती. त्यामुळे यातून तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये समझोता झाल्याचे पुढे आले आहे, असा घणाघात केला.
ममता बॅनर्जी यांच्या प्रत्येक निर्णयात आडकाठी आणणारे पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना बढती देत पश्चिम बंगालमधून हलवल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा सूर बदलला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी 1 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाईट नाही. कारण त्यात अजूनही अनेक लोक आहेत, ज्यांना भाजप करत असलेले राजकारण आवडत नाही, असं विधान केले होते. तर त्यापाठोपाठ पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकामागे पंतप्रधान मोदी यांचा हात नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे ममता यांचा मोदी विरोध मावळत चालला आहे का? याकडे राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत.