शिव्या देणारा पाहिजे की सेवा देणारा? मल्लिकार्जुन खर्गे यांचा सवाल
भारत जोडो यात्रेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सवाल करत शिव्या की सेवा? असा सवाल केला.;
काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं? असा सवाल भाजपकडून वारंवार विचारला जातो. मात्र देशातील मेडिकल कॉलेज, आय आयटी कॉलेज, रस्ते, विमानतळ, वैज्ञानिक संस्था काँग्रेसने उभ्या केल्या आहेत. मात्र या संस्थां विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे. त्यातच वारंवार काँग्रेसला शिव्या देण्याचे काम पंतप्रधान मोदी करत असतात. कारण आम्हाला शिव्या दिल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही. काँग्रेसला शिव्या कशा द्याव्यात, हे त्यांच्याकडे शिकवलं जातं. एक नेता देशाची सेवा करत आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेत आहे. तरीसुध्दा काँग्रेसला शिव्या दिल्या जातात. त्यामुळे तुम्हाला शिव्या देणारा नेता हवा आहे की सेवा देणारा नेता? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. ते नांदेड येथील भारत जोडो यात्रेच्या सभेला संबोधित करीत होते.
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर द्वेषाची परिस्थिती निर्माण होत आहे. पंडित नेहरु यांनी देशाची संस्कृती विविधतेतून एकतेकडे जाणारी असल्याचं म्हटलं होतं. पुढे पंडित नेहरु यांनी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर याच मार्गाने देशाचे सरकार चालवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान निर्माण केले. मात्र सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले संविधान धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे, असं मत व्यक्त केले.
पुढे बोलताना खर्गे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूकीवेळी दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मग कुठे गेले दोन कोटी रोजगार, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. यावेळी युवकांना रोजगार मिळावा, अशी राहुल गांधी यांची इच्छा असल्याचे मत खर्गे यांनी व्यक्त केले.
मल्लिकार्जन खर्गे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
- पंतप्रधान मोदी यांनी मोफत गॅसचे आश्वासन दिले होते. पण 400 रुपयांचा गॅस हजार रुपयांच्यावर गेला आहे.
- लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पण नोकरी देण्यायोग्य सार्वजनिक सेवा विकण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. पण काँग्रेसने जे आहे त्याचं रक्षण करण्याचं काम केलं.
- पंडित नेहरू यांनी रस्ते, विमानतळ यासह पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या, त्या सर्व विकण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. त्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब बनत आहे. दोन लोकांकडेच संपत्तीचं केंद्रीकरण होत असल्याची टीका खर्गे यांनी केली.
- एकीकडे काही लोक द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र दुसरीकडे या लोकांना जोडण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत.
- देशात मोदी सरकारकडून जुमलेबाजी आणि फोटोबाजी केली जात आहे.
- त्यामुळे सर्व जाती धर्माला एक करण्यासाठी राहुल गांधी तुमच्यासमोर आहेत.
- गरीबांना अन्न मिळत नसताना, त्यांना काम मिळत नसताना नरेगा योजना आणि अन्न सुरक्षेच्या माध्यमातून काँग्रेसने गरीबांना अन्न उपलब्ध करून दिलं. कारण आधी पोटोबा महत्वाचा आहे.
- तुमच्या हाताला काम देण्यासाठी आणि मुलाला शिक्षण देण्यासाठी सोनिया गांधी यांनी काम केलं. पुढे राहुल गांधी सांगतील त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करू.
- मोदी सरकारने मुलांच्या पेन्सिलवर, पीठावर, दुधावर जीएसटी लावला आहे. पण डरो मत, लढते रहो, लढेंगे नहीं तो जिएँगे नही. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसने लढण्याचा निर्धार केला असल्याचे म्हटले आहे.
- आप डरो मत, हम एक होकर लढेंगे. चलो हम मिलके चलेंगे तो देश को बचाएँगे. आप चुन के आने के बाद आप क्या करने वाले हो, असा प्रश्न एका व्यक्तीने विचारला होता. त्याला उत्तर देतांना खर्गे म्हणाले होते की, निवडून आल्यानंतर तुम्ही काय कराल असं विचारण्यापेक्षा निवडून आल्यावर आपण या देशासाठी काय करायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे. संविधान, देशाला, लोकशाहीला, शेतकऱ्यांना, महिलांना वाचवण्याचे काम आपण सर्वजण करू. त्यानेच हे सरकार आज नाही तर उद्या नक्की बदलेल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.