फडणवीस, शिंदे नको आता पंकजा मुंडेंनाच CM करण्याची मागणी

Update: 2022-06-22 01:37 GMT

राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे, असे सांगितले जाते आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले तेव्हा आपण फक्त सध्या टीव्हीवर बातम्या पाहत आहोत, असे म्हटले आहे.


पण पंकजा मुंडे यांचे समर्थक मात्र आता आक्रमक झाले आहेत. बीडमधील आष्टी येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांचे भाषण सुरू होते, या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशा घोषणा दिल्या. या घोषणा बाजीनंतर पंकजा मुंडे यांना हसू अनावर झालं. आणि त्या खळखळून हसल्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे माझी डोकेदुखी होते, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना समजावले.

विधान परिषद निवडणुकीत तिकीट कापले गेल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. त्यांनी यावर आतापर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. दुसरीकडे पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांमुळे डोकेदुखी होते असे वक्तव्य त्यांनी केल्याने त्याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Similar News