पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राकडे कायदा करण्याची मागणी...
दिवसेंदिवस देशात पत्रकारांवर हल्ले वाढत आहेत. त्या पत्रकारांना आपला जीव सुद्धा गमवावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका वरिष्ठ पत्रकारांवर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आली. त्या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र अशा घटना देशात किंवा राज्यात पुन्हा घडू नयेत आणि जर घडल्या तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आज नागपूरमध्ये राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
देशात हजारो पत्रकार आणि फोटोग्राफर जम्मू- काश्मीर (Jammu and Kashmir) ते कन्याकुमारी (Kanyakumari) पर्यत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर हल्ले होतात. असे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कायदा तयार करावा, अशी मागणी राज्यातील विविध पत्रकार संघटनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशातील पत्रकार आणि फोटोग्राफर सुरक्षित राहण्यासाठी कायदा करणे गरजेचे असल्याचे मत विविध पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रत्नागिरी (Ratnagiri) येथे एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्यात आले होते. त्यांचा रुग्णालयात घेवून जात असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीला पोलीसांनी अटक केली असून, सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र ही एकच घटना नाही आहे. अशा अनेक घटना राज्यात आणि देशात दररोज घडत असतात. त्यामुळे पत्रकारांवर होणार हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा आणि त्यांना सुरक्षित राहण्यासाठी देशात कायदा करण्याची गरज असल्याचे मत अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.