Chandrakant patil : फुले-आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, चंद्रकांत पाटील बरळले
भाजप नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांनी याआधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्यापाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.;
छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जुने आदर्श असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. राज्यपालांच्या विरोधात १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने मोर्चा आयोजित केला आहे. त्यातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधल्या कार्यक्रमात बोलताना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला दिला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, "कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भाजपात वाचळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी परत दाखवून दिलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडून वर्गणी आणि लोकसहभातून शाळा उभारल्या. स्वत: जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक नाही मागितली. भीक असे म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे," असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले की, चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे ते जिथं जातील तिथं गावागावात लोक त्यांचा चपलाचा हार घालून स्वागत करतील. तसेच अतुल लोढे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात. त्या शाळेचे हे संस्कार आहेत. त्यामुळे महापुरुषांबाबत वक्तव्य करून तुम्ही तीन्हीही महापुरुषांचा अवमान केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रात कोणतेही महत्वाचे प्रश्न उरले नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.