उध्दव ठाकरे यांना बसणार आणखी एक धक्का, राजन साळवी शिंदे गटात सामील होणार?
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातून दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ राजन साळवी हे सुध्दा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.;
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील विविध भागातील शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. मात्र यानंतर कोकणातून भास्कर जाधव, वैभव नाईक आणि राजन साळवी हे मात्र उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी राहिले होते. त्यातच आता राजन साळवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राजन साळवी उध्दव ठाकरे यांची साथ सोडण्याची कारणे?
राजन साळवी हे लांजा-राजापूर-साखरपा या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यातच राजापूर येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. मात्र राजन साळवी हे रिफायनरी प्रकल्पाचे जोरदार समर्थक आहेत. तर रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, असं मत राजन साळवी यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. मात्र त्यानंतरही विनायक राऊत यांनी या प्रकल्पाला विरोधच केला आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्याविरोधात राजन साळवी यांच्या मनात नाराजी आहे. मात्र विनायक राऊत हे उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. म्हणून राजन साळवी उध्दव ठाकरे यांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरूवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर राजन साळवी यांची भूमिकाही प्रकल्पाबाबत सकारात्मक आहे. त्यामुळेच सत्तेच्या मार्गातून हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठीची संधी आहे, असा विचार करून राजन साळवी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.