शिंदे गटाचा 'नवा विठ्ठल' राज ठाकरे?
राज ठाकरे आजारपणानंतर दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तर शिंदे गटाला मनसेचा पर्याय देत राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.;
आजारपणानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत थेट उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला नवा पर्याय देत सूचक वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. मात्र त्यानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तर या प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांना इतर पक्षात विलिनीकरणाशिवाय पर्याय असणार नाही. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
शिंदे गटातील आमदारांवरील अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना म्हणून मान्यता दिली नाही. तर त्यांना इतर पक्षात विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे मत घटनातज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेतील बंड केलेले शिंदे गटाचे 40 आमदार मनसे सोबत आले तर त्यांना स्वीकारणार का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, ते आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे 40 आमदार सोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच. त्यामुळे शिंदे गटाचा नवा विठ्ठल राज ठाकरे आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांनी मुलाखतीत उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेना बुडाल्याचं वक्तव्यही राज ठाकरे यांनी केलं. त्याबरोबरच उध्दव ठाकरे यांना टाळी देणार का? असा सवाल केला असता उध्दव ठाकरे विश्वास ठेवण्याजोगा माणूस नसल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे पुढील काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अनेक घटना अवलंबून असणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.