आपल्याच वक्तव्याने भाजप नेते कोंडीत

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत. मात्र राज्यात नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्यावरून शिवसेनेने भाजपला डिवचले आहे. मात्र यामुळे भाजप नेते चांगलेच कोंडीत सापडले आहेत.;

Update: 2022-07-15 03:13 GMT

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर 15 दिवस उलटून गेले तरी राज्यात नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला नाही. त्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून राज्यात सरकार आहे का? असा सवाल करत भाजपची चांगलीच कोंडी केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांची एक तऱ्हा तर उपमुख्यमंत्र्यांची दुसरीच तऱ्हा असा एकंदरीत प्रकार राज्यात सुरू आहे. त्यामुळे राज्यात सरकार कुठं आहे? मंत्रीमंडळ कुठं आहे? राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत का? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेसमोर पडले आहेत. राज्यात आज मंत्रीमंडळ नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळा सत्तेचा भार वाहत आहेत. त्यामुळे राज्यात नवे सरकार आले की गेले तेच कळत नसल्याचा टोला सामनातून नव्या सरकारला लगावला आहे. त्याबरोबरच सामनातून असे म्हटले आहे की, राज्यात मंत्रीमंडळाचा शपथविधी कधी होणार? मुळातच तो होणार की नाही? की विद्यमान सरकारचा ओंडका घटनेच्या पुरात वाहून जाणार असा सवाल उपस्थित केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांकडून सातत्याने राज्यात सरकार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्या वक्तव्याची आठवण काढून देत सामनातून भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यात ठाकरे सरकार असताना भाजप पिलावळीस प्रश्न पडत असे की, राज्यात सरकारचे अस्तित्व दिसत नाही. वैगेरे वैगेरे. पण आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला तोच प्रश्न पडतो आहे. राज्यात सरकार आहे काय? असलेच तर ते कुठं आहे? असा सवाल केला आहे. त्याबरोबरच शिवसेनेच्या फुटीर गटाबरोबर दिल्लीच्या साक्षीने सात फेरे घेतले. असे म्हणत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर मंत्रीमंडळाचा शपथविधी नाही. यावरून सामनातून नव्या सरकारवर टीका केली.

राज्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. महापुराने आतापर्यंत 90 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. अमरावतीमध्ये कॉलराची साथ पसरली आहे. तेथे आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोट ठेवत राज्यात भयंकर परिस्थिती निर्माण होत असताना फक्त दोन डोकी शब्दिक पतंगबाजी करत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना लगावला.

एकनाथ शिंदे हे बंद लॅपटॉपसमोर बसून विकास आढावा घेत असल्याचे सांगत एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या फोटोचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. तर मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना केलेल्या फोन कॉलचे लाईव्ह व्हिडीओ चित्रण करतात तर उपमुख्यमंत्र्यांची वेगळीच तऱ्हा आहे, असा टोलाही सामनातून लगावला.

राज्यातील जनतेसमोर अनेक प्रश्न आहेतक. मात्र नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाला इतका वेळ का लागतो आहे. यावरून शिंदे आणि भाजप गटात सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच पुढे सरकार घटनाबाह्य असल्याचा टोलाही सामनातून लगावला आहे. तर राज्यपालांच्या भूमिकेवरही सामनातून प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच दीपक केसरकर आणि राणे यांच्यात रंगलेल्या कलगितुऱ्यावरूनही टीका केली आहे.

मात्र राज्यात ठाकरे सरकार असताना भाजपकडून राज्यात सरकार कुठं आहे? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यावरून सामनाने भाजपला उलट सवाल केला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

Tags:    

Similar News