हे उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही, आमदारांच्या राड्यावरून रामदास आठवले यांचा संताप

विधानभवनच्या पायऱ्यांवर शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने आल्याने जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. त्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला.;

Update: 2022-08-25 02:40 GMT

विधानभवनच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गट विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने आले. त्यामुळे जोरदार खडाजंगी पहायला मिळाली तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत संताप व्यक्त केला.

विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधक आमने –सामने आल्याने राडा झाला. त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हे महाराष्ट्र राज्य आहे. हे उत्तर प्रदेश किंवा बिहार नाही. महाराष्ट्रातील राजकारण नितीमत्तेवर चालतं, दादागिरीवर नाही. त्यामुळे विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केलेला गोंधळ चुकीचा असल्याचे यावेळी आठवले म्हणाले.

तसेच विधानभवन परिसरात गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

काय घडलं विधानभवनच्या पायऱ्यांवर?

अधिवेशन सुरू होण्यापुर्वी पायऱ्यांवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी विरोधी पक्षांना डिवचण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली. त्यामध्ये लवासाचे खोके, एकदम ओके, सचिन वाझे चे खोके मातोश्री ओके अशा प्रकारच्या घोषणा होत्या. मात्र काही वेळाने त्याठिकाणी विरोधी पक्षांचेही आमदार आले. त्यावेळी त्यांनी पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.

Tags:    

Similar News