शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पुन्हा बॅनरबाजी
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बुधवारी झालेल्या राड्यानंतर गुरूवारी शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्रासह बॅनरबाजी केली.;
विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्राचे बॅनर झळकवत शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.
बुधवारी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाचे आमदार विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार आमने-सामने आले होते. त्यानंतर झालेल्या राड्यामुळे संपुर्ण देशात राज्याची नाचक्की झाली. मात्र त्यानंतर गुरूवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस पुन्हा आरोप प्रत्यारोपाने गाजण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांनी आदित्य ठाकरे यांचे बॅनर झळकवले आहेत.
यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी महाराष्ट्राचे परम पूज्य (प.पू) युवराज अशी अक्षरे लिहीलेला आणि आदित्य ठाकरे उलट्या दिशेने घोड्यावर बसलेले व्यंगचित्र काढलेले बॅनर झळकवण्यात आले. या बॅनरवर घोड्याचे तोंड हे हिंदूत्वाच्या दिशेने होते. मात्र आदित्य ठाकरे यांचे तोंड उलट दिशेने महाविकास आघाडीच्या दिशेने असल्याचे दाखवण्यात आले होते. 2014 मध्ये 151 ची मागणी करत युती बुडवली. 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदूत्वाची विचारधारा पायदळी तुडवली, अशा प्रकारे शिंदे गटाने बॅनरबाजी केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल
- युवराजांची दिशा नेहमीच चुकली.
- खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकांना केले तडीपार, सत्ता गेल्यानंतर फिरतात दारोदार
- पर्यटन खाते घेऊन घरात बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर
- पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वतः आमदार व्हायला एक महापौर आणि दोन आमदारांचे लागते कुशन
अशा घोषणांनी विधानभवन परिसरात शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
आदित्य ठाकरे यांनी दिलं उत्तर
जेव्हा चांगल्या खेळाडूची भीती वाटते. तेव्हा त्यांच्यावर स्लेजिंग केली जाते. त्याप्रमाणेच त्यांना माझी भीती वाटते. त्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही तुमच्यासाठी काय कमी केलं, याचं उत्तर द्यावं. तसंच मला त्यांची दया येते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.