एकनाथ शिंदे यांना धक्का?

उद्धव ठाकरे यांनी आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आता विधिमंडळाच्या पटलावर कायदेशीर लढाई करावी लागणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या माहितीमुळे एकनाथ शिंदे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

Update: 2022-06-23 07:58 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आपला गट हाच विधिमंडळातील अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रात ३४ आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे गटनेता नेमका कुणाचा मानायचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवलेला की एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे अधिकृत गटनेते आहेत असा कायदेशीर पेच आता निर्माण झाला आहे.

यासर्व संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर महत्त्वाची माहिती दिली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार गटनेता निवडण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांना आहे. त्यानंतर गटनेत्याने प्रतोद निवडण्याचा अधिकार असतो. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडलं होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त केले आहे, असे पत्र त्यांनी दिले आहे, अशी माहिती नरहरी झिरवळ यांनी दिली आहे. पण या पत्रावर कुणाचे काही आक्षेप असतील तर ते तपासावे लागतील, त्याला वेळ लागेल असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले आहे. देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला असे सांगितले जाते आहे, पण आता ते त्यांच्या गावी आहेत. आपण नेहमी इंग्रजीमधून सही करतो, पण एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावर देशमुख यांची सही मराठी आहे, त्यामुळे ती सही खरी मानू नये असे त्यांनी आपल्याला कळवल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे. याचीही चौकशी केली जाणार असल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. नरहरी झिरवळ यांची बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांच्यासोबत काही तास बैठक झाली होती.

Full View

Tags:    

Similar News