शिंदे गटाचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

Update: 2022-08-29 06:59 GMT

रायगड : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करत सरकार स्थापन केले. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. पण यामध्ये बंडखोर आमदारांनी राजकारणात येण्याआधी केलेल्या व्यवसायांवरुन त्यांच्यावर टीका केली जात असल्याबाबत शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिवसेना मेळाव्या दरम्यान मंत्री उदय सामंत, भरत गोगावले सहभागीयांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे गटातील नेते शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांना त्यांच्या व्यवसायावरून हिणवत आहेत. एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला, गुलाबराव पाटील यांना पान टपरीवाला, संदीपान भुमरे यांना हमाल आणि महिलांना खालच्या भाषेत हिणवलं जात असल्याचा आरोप करत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील रिक्षा व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक, हमालांची आकडेवारी सांगत हा अपमान त्या व्यक्तीचा नाही तर तो व्यवसाय करणाऱ्या समुदायाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे.

याच मेळाव्या दरम्यान विधान सभेच्या पायऱ्यांवर झालेल्या वादाचा किस्सा सांगताना भरत गोगावले यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीची आठवण करून दिली. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली, तसेच आमचे चुकले असेल तर राजीनामा देऊ असे देखील त्यांनी ठासून सांगितले.

Tags:    

Similar News