Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर आज अखेरची सुनावणी, निकालाच्या तारखेकडे लक्ष
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षावरची सुनावणी आज संपणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष निकालाच्या तारखेकडे लागले आहे.;
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर सुरु झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीचा आज अखेरचा दिवस असून सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Political Crisis : गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यामध्ये ठाकरे आणि शिंदे (Thackeray Vs Shinde) गटाच्या वतीने युक्तीवाद पूर्ण होत झाला आहे. त्यामुळे आज राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (SG Tushar Mehata) 10-15 मिनिटांमध्ये बाजू मांडणार आहेत. त्यानंतर स्पष्टीकरणासाठी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल (Kapil Sibbal) बाजू मांडतील आणि सर्वोच्च न्यायालय निकालातील सुनावणी संपेल, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी म्हटलं आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शिवसेनेत फूट पडण्यासाठी उध्दव ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरल्याचा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद मिटणे शक्य नव्हते. शिंदे गटातील आमदारांना मारण्याची भाषा करण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात येण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता, असं मत महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी व्यक्त केले.
आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही
आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार (10 th Schedule) अपात्र करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. याबरोबरच विधीमंडळ आणि राजकीय पक्ष हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे पक्षात फूट पडल्याचा दावा चूकीचा असून शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. यासंदर्भातील निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं मत नीरज कौल (Neeraj kaul) यांनी व्यक्त केले.
राजभवनमध्ये आमदारांची परेड करण्याची गरज नाही
संख्याबळ तपासण्यासाठी राजभवनमध्ये परेड करण्याची गरज नसते. बहुमत चाचणी ही विधानसभेत होत असते, राजभवनमध्ये नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे- भाजप ला सरकार स्थापन करण्याचा निर्णय योग्य होता, असा युक्तीवाद मनिंदर सिंग (Malindar singh) यांनी केला.
उपाध्यक्षांच्या हेतूवर प्रश्न
उपाध्यक्षांनी शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. मात्र उत्तर देण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी दिला. त्यामुळे उपाध्यक्षांची कृती ठाकरे सरकार वाचवण्यासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आता घड्याळाचे काटे उलट फिरवता येणार नाहीत, असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात महेश जेठमलानी यांनी केला.
पाच सदस्यीय घटनापीठ देणार निकालाची तारीख (Constitutional Bench)
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud), न्यायमुर्ती हिमा कोहली (Justice Hima kohli), न्यायमुर्ती एम आर शहा (Justice MR Shah), न्यायमुर्ती कृष्ण मुरारी (Justice Krushna murari), न्यायमुर्ती पी. एस नरसिंह (Justice PS Narsingh) यांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होती. ती सुनावणी आज ठाकरे गटाच्या स्पष्टीकरणाच्या युक्तीवादानंतर संपण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे या सत्तासंघर्षावर निकाल कधी येणार? याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. कारण या प्रकरणाचा निकाल लोकशाहीतील मैलाचा दगड ठरणार आहे.