पक्षाच्या नावावरून शिंदे- ठाकरे गट आमने-सामने येणार?
गेल्या अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष रंगला आहे. त्यातच पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.;
शिवसेना आणि धनुष्यबाणावर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दावा सांगितला होता. त्यामुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी तीन चिन्हांची नावं आणि तीन पक्षांची नावं निवडणूक आयोगाला पाठवले आहेत. त्यापार्श्वभुमीवर उध्दव ठाकरे गटाने पाठवलेल्या नावांवरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गट पुन्हा आमने-सामने येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तीन चिन्ह आणि पक्षाच्या तीन नावांची घोषणा केली. त्यात उध्दव ठाकरे यांनी त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल ही चिन्ह निवडणूक आयोगाला पाठवले आहेत. त्याबरोबरच शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशी संबंधीत 2 नावांवर दावा केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी 1 वा. पर्यंत दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह आणि पक्षाची नावं सादर करण्यास सांगितले होते. मात्र उध्दव ठाकरे गटाने चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय दिले असले तरी शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासंबंधी दोन चिन्हांवर दावा सांगणार आहे. त्यामुळे पुन्हा उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट निवडणूक आयोगासमोर आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जाण्याची शक्यता असल्यामुळेच उध्दव ठाकरे यांनी तातडीने शनिवारी पक्षाच्या नावांची यादी सादर केली. मात्र पुन्हा एकदा एकाच नावावर दोन्ही गटांनी दावा सांगितला तर कायदेशीर पेच निर्माण होऊन ते नाव दोन्ही गटांना मिळणार नसल्याची चर्चा आहे.
शिंदे गटाची संभाव्य चिन्ह
एकनाथ शिंदे यांच्या गटाने अजूनही निवडणूक चिन्ह सादर केले नाही. मात्र तुतारी, गदा आणि तलवार हे तीन संभाव्य चिन्ह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच सोमवारी सकाळी शिंदे गट पक्षाच्या नावांची आणि चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे.
मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपणच पुढे नेत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाच्या नावावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग शिंदे गटाला कोणते आणि ठाकरे गटाला कोणते नाव आणि चिन्ह देणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.