सर्वोच्च न्यायालयाच्या कामाचा वेग वाढला, एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर आज सुनावणी

देशात अनेक खटले वर्षानुवर्षे सुरू राहतात. मात्र त्यावर निर्णय होत नाही. अशा परिस्थितीत कोर्टाने आपल्या कामाचा वेग वाढवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रविवारी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.;

Update: 2022-06-27 02:46 GMT

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या गटाची कोंडी करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र बंडखोरी केल्याच्या कारणावरून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची निवड केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याविरोधात एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील सत्तासंघर्ष आणखी वाढला आहे. तर आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. त्यामध्ये शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे आणि भारत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर या याचिकांवर न्यायमुर्ती जे बी पारदीवाला आणि न्यायमुर्ती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

नेमका वाद काय?

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले. त्यानंतर हे 40 पेक्षा जास्त आमदार हे सुरतमार्गे गुवाहटीला पोहचले. त्यावरून शिवसेना आक्रमक झाली. तर् त्यांनी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीला सोमवारी संध्याकाळपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. दरम्यान या नोटीसीला एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे हे बाजू मांडणार आहेत. त्याबरोबरच शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडणार आहेत . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामाच्या वाढलेल्या वेगाचा कुणाला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबरोबरच अशाच प्रकारे सर्व प्रकरणांची सुनावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी या याचिकेनंतर सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News