काँग्रेस राष्ट्रवादी नको, भाजपसोबत युतीची बंडखोर आमदाराची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर बंडखोर गटाचे आमदार गुवाहटी येथे आहेत. मात्र शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे.

Update: 2022-06-26 09:16 GMT

एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 पेक्षा जास्त आमदारांसह गुवाहटी गाठली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिंदे समर्थक गटातील जळगाव जिल्हातील पाचोऱ्याचे आमदार चिमणराव आबासाहेब पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमदार चिमणराव पाटील म्हणाले की, आम्ही गेली ३० वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. तसंच आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत आमची लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्धच आहे.

त्यामुळे या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांस ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला. नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे, अशी स्पष्ट भूमिका चिमणराव पाटील यांनी घेतली.

Full View

Tags:    

Similar News