" शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका झाली तशी माझी सुरतमधून झाली"

Update: 2022-06-22 09:48 GMT

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांच्या या बंडात पक्षाचे अनेक आमदार सहभागी झाले आहेत. या सर्व आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीला गुजरातमधील सुरत गाठले. त्यानंतर गुवाहटीमध्ये आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावाही एकनाथ शिंदेंनी केला आहे. पण आता एकनाथ शिंदे यांना एक धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले आहे. पण यावर आपली सही नाही,असे स्पष्टीकरण शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी दिले आहे. देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये होते. पण त्यांनी आपल्याला जबरदस्ती नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. "मला रस्त्यावरून उचलून गाडीत कोंबलं आणि एक दवाखान्यात भरती केलं. मला कुठलाही त्रास नसताना माझी बीपी चेक केली आणी तुम्हाला अटॅक आल्याचं सांगितलं. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांची आग्रातून सुटका झाली त्याचप्रमाणे माझी सुटका झाली" असे नितीन देशमुख म्हणाले. कालपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले आमदार नितीन देशमुख बुधवारी नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक आरोप केला आहे, तसेच "मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला तिथल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे, असे धमकावले. तेव्हा माझी तब्येत ठीक होती पण मला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरवली गेली. वीस-पंचवीस लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला वाटते माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांच षडयंत्र होतं" असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.

Full View

Tags:    

Similar News