तातडीने अधिवेशन बोलवा, नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.;
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची विधीमंडळाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद झाला. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून घेत इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अग्नीपथ योजनेमुळे निर्माण झालेला उद्रेक दाबण्यासाठी महाराष्ट्राला लक्ष करण्यात येत आहे. त्याबरोबरच जरी मांजर डोळे मिटून दुध पित असली तरी लोकांना सर्व समजतं. त्यामुळे डोळे बंद करून दुध पिणाऱ्या मांजरीसारखी भाजपची अवस्था असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली. तसेच राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर राज्यपाल महोदयांनी भूमिका घेत विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
शिंदे गटाकडून 40 आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर सरकार अल्पमतात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात असेल तर ते मांडावे, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटले.
नाना पटोले पुढे म्हणाले की, सुरत आणि गुवाहाटी येथे सरकार कोणाचं आहे. ते सगळ्यांना माहित आहे. कारण जनता आंधळी नाही. त्यामुळे या बंडखोर आमदारांच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याची अप्रत्यक्ष टीका केली आहे.
केंद्र सरकार राज्याचे तुकडे करत आहे. तसंच राज्यात सध्या ही परिस्थिती निर्माण करण्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. तर शिंदे गट ज्याप्रकारे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जात आहे. त्याप्रमाणे सरकार अल्पमतात असेल तर राज्यपालांनी तातडीने भूमिका घेऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवं, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.