एकनाथ शिंदे यांची प्रकृती का बिघडली? शिवसेनेने सांगितले कारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाण्यापुर्वीच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यावरून शिवसेनेने सामनातून एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडण्याचे कारण सांगितले आहे.;
सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारचा फैसला जवळ आला आहे. त्यापुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती बिघडण्याचे कारण काय? यावरून शिवसेनेने टीकास्र सोडले आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून राज्याची राजकीय प्रकृती बिघडली होती. पण ज्यांच्या फुटीरतेमुळे आणि विश्वासघाताच्या डायरियामुळे राज्याची प्रकृती खालावली ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आजारी पडल्याचे समजले. ही बाब अलिबाबा आणि चाळीस चोरांसाठी चिंताजनक असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
माणूसाचे शरीर म्हणजे एक यंत्र आहे. त्यामध्ये अधूनमधून बिघाड होणारच. पण एकनाथ शिंदे किमान 20 ते 22 तास काम करतात. त्यांचा कामाचा उत्साह आणि उरक दांडगा असल्याचे म्हणत त्यांच्या अवतीभोवती कोणत्याही प्रकारचा व्हायरस फिरत नाही. मात्र तरीही एकनाथ शिंदे आजारी पडले ही गोष्ट चाळीस चोरांसाठी चिंताजनक असल्याचा टोला सामनातून शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.
सर्वोच्च न्यायालयात ज्या घडामोडी सुरू आहेत. त्याचा एकनाथ दे यांच्या आजारपणाशी संबंध जोडत निर्णय विरोधात जाणार असल्यानेच शिंदे आजारी असल्याची शक्यता सामनातून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचा त्याग करून स्वतंत्र गट स्थापन केला आहे आणि आमचीच खरी शिवसेना असा दावा केला आहे. त्यांच्यासाठी हे चिंताजनक असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. हा दावा विनोदी आहे, असं म्हणत उद्या शिंदे व त्यांचे लोक ग्वाल्हेरला जाऊन जिजाजी राजे शिंदे यांच्या सर्व मालमत्तांवर हक्क सांगतील, अशी खोचक टीका सामनातून केली आहे.
पुढे सामनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटास फार टोकदार प्रश्न विचारला आहे की, तुम्ही बंडखोर नाहीत तर कोण आहात? तसंच पक्षाचा नेता भेटत नाही म्हणून नवा गट स्थापन करू शकता का? असा सवाल केला. त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री पदाची लालसा आणि ईडी वैगेरेंच्या कारवायातून सुटका करून घेण्यासाठी शिंदे आणि त्यांच्या टोळीने विश्वासघात केल्याचा आरोप सामनातून केला आहे.
विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे शिंदे गटापुढे दोनच पर्याय आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे सर्वांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे आणि दुसरा पर्याय म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे. मात्र यासाठी किती आमदार तयार होतील. एवढंच नाही तर पुन्हा मंत्रीपदासाठी मारामाऱ्या होणार हे निश्चित असल्यानेच शिंदे औषधोपचारासाठी आजारी पडले असावेत, असा टोला शिवसेनेने सामनातून लगावला आहे.
शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावर शिंदे गटाने दावा केला होता. मात्र यावरही सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यातूनही नवे आजार जडू शकतात, असा टोला लगावला आहे. तसेच आपण फार मोठी क्रांती केली असल्याचा एकनाथ शिंदे यांचा भ्रमाचा भोपळा फुटायला लागला असल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडल्याची शक्यता सामनातून वर्तवली आहे.
शिवसेनेच्या मागे राज्यातील जनता असून लवकरच उध्दव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यात राज्याचा माहोल बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे उडालेला धुराळा पाहून हा आजार जास्तच बळावेल आणि कोणी कितीही जादूटोणा केला तरी शिवसेनेची लाट रोखता येणार नाही, असंही सामनात म्हटले आहे.
8 ऑगस्टला सत्य आणि इमानदारीचा विजय होईल, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर विश्वास व्यक्त केला आहे. तर न्यायालयात काही रामशास्री न्यायाचा तराजू समतोल करण्याचे राष्ट्रकार्य करत आहेत. त्यामुळे अलिबाबा आणि चाळीस चोरांची बाजू कायद्याने आणि नितीने खरी असती तर मंत्रीमंडळाचा शपथ विधी झाला असता, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. त्यातच गुरूवारी फडणवीस एकटेच दिल्लीला गेले आणि इकडे एकनाथ शिंदे आजारी पडले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दिल्लीची हवा मानवत नसावी किंवा महाराष्ट्राची हवा बिघडवल्याने त्यांना गुदमरल्यासारखे होत असावे, अशी टीका केली आहे.
लग्न झाल्यावर पाळणा हालला नाही तर लोक संशयाने पाहतात आणि दांपत्यास अनेक सल्ला देतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बळंबळंच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेतली पण मंत्रीमंडळ जन्माला येत नाही. त्यामुळे मधुचंद्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच पक्ष सोडला नाही तर पक्षांतर बंदी का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना एकनाथ शिंदे यांचे डोकं ठणकत राहील. त्यातून त्यांना एक दिवस डोक्यावरचे केस उपटत बसावं लागेल. तर कोर्टाचा फैसला जवळ आल्यानेच मधुचंद्र झाला मात्र लग्नच करायचे विसरल्यासारखी अवस्था शिंदे गटाची झाली आहे. त्यामुळे त्यांना मळमळत आहे. गरगरत आहे. त्यांनी क्रांतीच्या वल्गना केल्या पण आता भीतीपोटी वांती सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे सामनात म्हटले आहे. तसंच या औटघटकेच्या सरकारसाठी स्ट्रेचर आणि अँबुलन्स तयार ठेवायला हवी. मात्र एकनाथ शिंदे आजारी पडणे हे त्यांच्या चाळीस समर्थकांसाठी निश्चित शुभशकुन नाही. पण तरीही शिंदे यांनी लवकर बरं व्हावं. कारण त्यांना अजून बरंच काही पहायचं आहे आणि ते पाहण्याची ईश्वर त्यांना बळ देवो, असा खोचक टोला सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आजारपणावरून लगावला आहे.