भाजपमुळे हुकलं एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची कबुली शिवसेनेने दिली आहे. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद का देण्यात आले नाही, जाणून घेण्यासाठी वाचा...
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तानाट्याचा सहावा दिवस उजाडला आहे. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत शिवसेनेने रोखठोक भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधातच बंड केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांना उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने सामनाच्या रोखठोक सदरातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महत्वाची पदं देण्यात आली. त्यानंतर जे नगरविकास मंत्रीपद मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवत असतात ते खातं एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. या खात्याची जबाबदारी आणि आर्थिक उलाढाली मोठ्या असतात. याबरोबरच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्याबाबत उध्दव ठाकरे यांनी शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेतूनच हे बंड झाले असल्याची जी चर्चा सुरू आहे त्यावर सामनाच्या रोखठोकमध्ये भूमिका मांडली आहे. यामध्ये म्हटले आहे की, जर देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते आणि उध्दव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांचेच नाव पुढे केले असते, अशी भूमिका सामनाच्या रोखठोकमध्ये मांडण्यात आली आहे.
पुढे सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे की, ज्या भाजपने घात केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही. त्याच भाजपसोबत एकनाथ शिंदे गटाला जायचे आहे हे मोठे आश्चर्य असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.
महाविकास आघाडीची गरज म्हणून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी केलेल्या आग्रहामुळे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र भाजपने शब्द फिरवल्यामुळेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद हुकले असल्याचे मत सामनाच्या रोखठोकमध्ये मांडले आहे.
शिवसेनेचे आमदार का फुटले?
पुढे रोखठोकमध्ये फुटलेले आमदार मुळचे कोण? हे सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की, शिवसेनेतून जे आमदार फुटले आहेत. त्यापैकी एकही आमदार शिवसेनेचा नाही. त्याबरोबरच अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदूत्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आले? असा सवालही यावेळी करण्यात आला. याबरोबरच माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रवास करीत शिवसेनेत आले आणि मंत्री झाले. त्यांनी भाजप आणि हिंदूत्वाच्या गप्पा मारत सुरतमार्गे गुहावटी प्रवास करणे हे गमतीचे असल्याचेही यावेळी या सदरात म्हटले आहे.
शिवसेना आमदार सुहास कांदे आणि तानाजी सावंत यांना रोखठोकमध्ये फिरस्ते म्हटले आहे. तर ते चाय तिकडे न्याय या धोरणाचे असल्याची टीका सामनातून केली आहे.
पुढे प्रताप सरनाईक, यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांच्यावर ईडी आणि जातपडताळणीची टांगती तलवार असल्याचे सांगत त्यांनी ईडीला घाबरून बंड केल्याचे म्हटले आहे. पुढे गुलाबराव पाटील हे टपरीवाल्याला शिवसेनेने मंत्री केलं असं जाहीर सभांमधून सांगतात. ते गुलाबराव ईडीची धमकी येताच पळाले, असा टोलाही यावेळी लगावला आहे.
पैठणमध्ये मोरेश्वर सावे या शिवसैनिकाची उमेदवारी कापून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. एका कंपनीच्या वॉचमनला 30 वर्षांपासून सत्तेत ठेवलं. त्या संदीपान भुमरे यांनी सुरतला पळ काढला आहे. याबरोबरच दादा भुसे हे फडणवीस यांच्यासह सध्याच्या मंत्रीमंडळात आहेत. त्यांनी फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अन्याय होत असल्याचे म्हटले होते. तर त्यांना महाविकास आघाडीतही जाच होत असल्याचे म्हटले आहेत, असं सांगत शिवसेनेचे आमदार फुटण्याची कारणं रोखठोकमध्ये मांडले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनाही सल्ला
पुढे रोखठोकमध्ये म्हटले आहे की, या सर्व घडामोडींचे सुत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर ते चुकीचं करत आहेत. शिवसेनेतील फुटीरांना प्रोत्साहन देऊन फ़डणवीस सरकार बनवणार असतील तर ते टिकणार नाही. या आमदारांची भूक मोठी आहे म्हणत जे आईला सोडू शकतात ते फडणवीस यांनाही सोडू शकतात, असा सल्ला यावेळी दिला. तसंच फुटीरांबरोबर सरकार बनवणं म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या आहेत, असं सल्ला रोखठोकमधून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.