राज्यातील सत्तानाट्यात ठाकरे सरकार कोसळले, त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस यांची याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे. या सर्व नाट्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याने खळबळ उडाली.
पण आता त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी धनंजय मुंडे गेले होते, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जिथे - जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
त्याचबरोबर संजय राऊत यांच्या ED चौकशीबाबत बोलताना, राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा आपण करुयात असेही जयंत पाटील म्हणाले.