राज्यात भाजपचं सरकार? फडणवीस रिचेबल, राज्यपालांना डिस्चार्ज
राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यात भाजपने अधिकृत प्रवेश केला नव्हता. तर देवेंद्र फडणवीस नॉट रिचेबल होते. दरम्यान फडणवीस रिचेबल झाले असून राज्यपालांनाही डिर्चार्ज मिळाला आहे.;
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या मागे असलेले मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस आता रिचेबल झाले आहेत. राज्यात भाजपचं सरकार यायचा मार्ग मोकळा झाल्याने आता या सर्व सत्तानाट्याची सूत्रे ते उघडपणे आपल्या हाती घेतील असं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. संख्याबळ आणि तांत्रिक-कायदेशीर बाबींवर विविध तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर तसंच पक्षश्रेष्ठींना संख्याबळाचं आश्वासन दिल्यानंतरच आता देवेंद्र फडणवीस यांनी या सत्तानाट्यात अधिकृत प्रवेश केला आहे.
सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात व्यंकय्या नायडू यांनी २०१७ मध्ये शरद यादव प्रकरणात संसदीय कामकाजाबाहेरील सदस्यांचे वर्तन ही पक्षविरोधी कारवायांसाठी ग्राह्य धरले होते. शरद यादव यांनी इतर पक्षांच्या व्यासपिठावर जाऊन पक्षाच्या धोरणांच्या विरोधात काम केल्याचा युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला होता. याचमुळे एकनाथ शिंदे यांनी फुटण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या व्यवस्थेत भाजपा नेत्यांचा सहभाग दिसून आला, नंतर तातडीने भाजपाने प्रसिद्धी पत्रक काढून शिवसेनेतील अंतर्गत वादांशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये विधीमंडळाचे नियम, प्रथा, घटनात्मक तरतूदी यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे या लढाईत जराही चूक झाली तर एकनाथ शिंदे यांचे बंड फुकट जाणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या फुटीत व्यूहरचनेचं काम केले आहे. सदस्यांच्या अपात्रतेची शक्यता लक्षात घेऊन उपाध्यक्षांवर अविश्वास दर्शवण्याबरोबरच प्रतोद आणि गटनेत्याच्या वादातलं ड्राफ्टींग असो. यात फडणवीस यांचा टच लगेच लक्षात येतो. एकनाथ शिंदे यांच्या सोबत बडोदा इथे झालेल्या गुप्त बैठकीनंतर बऱ्याच वादाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ही सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये विलिनीकरण नको असल्याने आधी सरकार पाडणे, शिंदे गटाचा बाहेरून पाठींबा घेऊन सरकार बनवणे या प्राथमिकता ठरल्याचं सांगितलं जात आहे.
नव्याने निवडणुकांना सामोरे जाणे हा देखिल एक पर्याय भाजपसमोर होता, मात्र संख्याबळ जुळून आल्याने आता सत्तास्थापनेची तयारी करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांड ने घेतला आहे. त्यानुसार इतके दिवस नॉट रिचेबल असलेले फडणवीस पुन्हा रिचेबल झाले आहेत. फडणवीस यांच्या रिचेबल होण्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ही कोरोना मुक्त झाले आहेत. आजच त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे आज आणि उद्या फडणवीस एकेक करून आपले पत्ते खोलायला सुरूवात करतील अशी शक्यता आहे.
सत्ता स्थापनेची ही प्रक्रीया काहीशी किचकट असणार आहे, त्यामुळे सोमवारी न्यायालयाच्या दारात ही हा विषय नेला जाईल. महाविकास आघाडीकडे उपाध्यक्ष तर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्याकडे राज्यपाल असे महत्वाचे संसदीय आयुधं आहेत. कसं ही करून बॉल राज्यपालांच्या कोर्टात आणायची फडणवीस यांची रणनिती आहे.