सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उध्दव ठाकरे यांना सहन होत नाही- अतुल भातखळकर यांची टीका
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर अतुल भातखळकर यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.;
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारला आहे. दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी विशेष अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Shivsena file plea in supreme Court) धाव घेतली. त्यावर अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असल्याचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. तर सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उध्दव ठाकरे यांना पहावत नाही, अशी टीका केली आहे. (bjp Leader atul Bhatkhalkar Criticize to Uddhav Thackeray)
या व्हिडीओमध्ये अतुल भातखळकर म्हणाले आहेत की, उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पहावत नाही. त्यांना केवळ आपणच मुख्यमंत्री असावे असं वाटतं. कारण आता सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होऊनही शिवसेना कोर्टात गेली आहे. त्यामुळे 2019 मध्येही उध्दव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री पद हवं होतं. त्यामुळे त्यांनी जनादेश धुडकावून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला.
पुढे बोलताना भातखळकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. कारण ते बहुमताला घाबरले. विधीमंडळाला सामोरे जाण्याची भीती वाटली. तसंच उध्दव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्री आणि माझा मुलगा उपमुख्यमंत्री व्हावा, असा आरोप मी अनेकदा केला होता. तो आरोप आत सिध्द होताना दिसत असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून शिवसेनेला चांगलीच चपराक लगावली असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले आहेत. तर यानंतर अतुल भातखळकर यांनी व्हिडीओसह सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उध्दव ठाकरे यांना पहावत नाही, असं म्हटलं आहे.