मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतेमंडळी नाशिक दौरा करत आहेत, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई अमेय खोपकर , अविनाश जाधव, संजय नाईक अशा सर्व मनसे नेत्यांना राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करण्याचा आदेश दिला आहे, त्यानुसार आम्ही नाशिक दौरा करणार आहोत अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे.
पाच वर्षांपासून नाशिकमध्ये आणि दत्तक योजना जाहीर केल्यापासून नाशिकच्या विकासाचा कुठलेही काम आपल्याला होताना दिसत नाही. पहिल्या पाच वर्षात जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती तेव्हा मोठे प्रोजेक्ट, नाशिकमध्ये झालेले रस्ते चांगले झाले, त्यामुळे नाशिककरांच्या मनात मनसेबद्दल विश्वास आहे. अस मत देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केलं.
येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये 'एक प्रभाग एक नगरसेवक' अशी पध्दत लागु करण्यात आली आहे त्यामुळे नाशिकचा दौरा करून माहिती घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात येईल आणि मोर्चेबांधणी केली जाईल असं देशपांडे यांनी सांगितले.नाशिककरांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नेहमी चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि यावेळीही तसाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.