सध्या देशामध्ये भोग्याचा वाद शिगेला पोहोचला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लाऊडस्पीकरवरून सुरू असलेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. धार्मिक स्थळावरून भोंगे हटवण्याचा प्रश्नच येत नाही. यासोबतच त्यांनी, बिहार सरकार कोणत्याही धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकरचा वाद निरर्थक आहे. अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून धार्मिक स्थळांचे लाऊडस्पीकर हटवल्यानंतर नितीश कुमार यांनी हे विधान केलं आहे. बिहारमधीरल पूर्णिया या जिल्ह्यात माध्यमांशी बातचीत करत असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील पहिल्या ग्रीन फिल्ड ग्रेन - आधारित इथेनॉल प्लांटचे लोकार्पण केले. यावेळी नितीश कुमार यांनी लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी निरर्थक असल्याचे सांगत बिहार मध्ये आम्ही कोणत्याही धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या काळात प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. बिहार मध्ये आम्ही कोणाच्याही धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करत नाही. सर्व लोक आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी स्वतंत्र आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात लाऊडस्पीकरच्या भूमिकेवरून तणाव निर्माण झाला आहे. त्या दरम्यान बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.