कोल्हापुरात राडा; जवाब दो! खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा
मोठा बंडानंतर राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले असले तरी आता ठीक ठिकाणी बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक दिसून येत आहे.;
मोठा बंडानंतर राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले असले तरी आता ठीक ठिकाणी बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिक व मतदारांच्या भावनांचा अपमान केला असून त्यांच्या कोल्हापूर येथील कार्यालय आणि घरावर धडक मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, आज खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकला आहे. खासदार माने सध्या दिल्ली येथे असून या मोर्चाला विरोध करु नका अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
खासदार माने यांना प्रवक्ता पदासह सर्वकाही देऊनही त्यांनी कुटुंबाशी गद्दारी केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर व कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली होती. खासदार माने हे शिंदे गटात गेले असल्याने कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेकडून पद मिळूनही मानेंनी हा निर्णय का घेतला असा सवाल आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे खासदार माने जवाब दो, अशा घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरात मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने बंडखोर यांच्या गोटामध्ये चिंता पसरली असून पोलिसांनी वेळीच अटकाव केल्यामुळे अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याने काही काळ तणावग्रस्त परिस्थिती देखील निर्माण झाली होती.