ठाकरे सरकार करतंय गांजाची शेती, किरीट सोमय्या यांची घणाघाती टीका

Update: 2022-01-09 10:55 GMT

मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीत चांगलाच कलगितुरा रंगला आहे. ठाकरे सरकार कमाईसाठी लॉकडाईनची भीती घालत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या गांजा पिऊन खुर्चीत बसतात असा टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देतांना ठाकरे सरकार गांजाची शेती करत असल्याची भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली.

महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. त्यातच आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यावरून राज्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. तर ठाकरे सरकार कमाईसाठी भीती घालत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यावरून किरीट सोमय्या गांजा पिऊन खुर्चीत बसतात असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांना लगावला होता. त्यावरून किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले.

किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, मुंबईत महापौरांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर यांच्या क्रिश इंटरप्रायझेसला वरळीत कोविड केअर सेंटरचे टेंडर मिळाले आहे. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता आहे. त्यासोबतच आधी कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यानंतर कंपनीची स्थापना केली जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील 6 कोविड केअर सेंटर कोणाला दिले आहेत, याची माहिती जाहीर करावी, असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांना केले आहे.

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, दहिसर येथे 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. शनिवारी त्याची क्षमता वाढवून 750 केली. पण तेथे एकही रुग्ण उपचार घेत नाही. तर महापौरांनी सोमय्यांना गांजा पिऊन खुर्चीत बसत असल्याची टीका केली होती. त्यावरून प्रत्युत्तर देतांना सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार गांजाच्या प्रेमात आहे. कारण ठाकरे सरकारचे मंत्री हलक्या गांजावर बोलतात, शरद पवार हर्बल गांजा विषयी बोलतात तर महापौरांनाही विरोधी पक्ष गांजा घेतल्यासारखा वाटतो. त्यामुळे ठाकरे सरकार गांजाची शेती करत आहे, असं विधान सोमय्यांनी केले.

पुढे सोमय्या म्हणाले की, मुंबईत आढळणाऱ्या 20 हजार नव्या कोरोना रुग्णांपैकी 17 हजार लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. तर मुंबईतील 25 टक्केही बेड रुग्णांनी भरलेले नाहीत. मग ठाकरे सरकार भीती का घालत आहे?, असा सवाल सोमय्या यांनी केला. तर पुढील आठवड्यात शिवसेनेच्या नेत्यांनी अपारदर्शकरित्या परवानग्या मिळवून उभ्या केलेल्या कोविड सेंटरचा पुराव्यासह पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. 

Tags:    

Similar News