गुजरामधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जिग्नेश मेवानी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. २८ सप्टेंबर रोजी आपण आणि कन्हैय्याकुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जिग्नेश मेवानी यांनी २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून विजय मिळवला होता. तर कन्हैय्या कुमार यांनेदेखील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर कन्हैय्या कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.
काँग्रेस प्रवेशाचा हा कार्यक्रम दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मेवानी यांनी दिली आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनीही मेवानी आणि कन्हैयाकुमार यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे. सर्व क्रांतीकारी तरुणांचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे. देशाचा विकास करण्यासाठी महात्मा गांधी, सरदार पटेल आणि पंडीत नेहरु यांच्या तत्वांचे पालन करुन काँग्रेसलाही भक्कम करण्याचे काम ते नक्की करतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.