कन्हैया कुमार लेफ्ट टू सेंटर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना जिग्नेश मेवानी देखील कॉंग्रेस मध्ये जाणार असल्याचं समजतंय. कन्हैया कुमार गेल्या काही दिवसांपासून स्वत:च्या पक्षांमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकारणात सुरु आहे. कन्हैया कुमार ला कॉंग्रेसमध्ये घेण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु असताना जिग्नेश मेवानी देखील कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी आमदार आहेत. कॉंग्रेसने त्यांच्या विरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळं जिग्नेश मेवाणी यांना मदत झाली होती. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 28 सप्टेंबरला शहीद भगतसिंह यांची जयंती आहे.
दरम्यान निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या मते कॉंग्रेसमधील जुन्या नेत्यांचा करिश्मा आता संपला आहे. नवीन पीढीमध्ये कोणताही मोठा नेता नाही. त्यामुळे कन्हैया कुमार जर कॉंग्रेस मध्ये आले तर पक्षाला नवीन उर्जा मिळू शकते. विशेष बाब म्हणजे गेल्या दीड वर्षात कन्हैया कुमार सीपीआई मध्ये सक्रीय नाही. त्यामुळं या चर्चेला आणखी बळ मिळालं आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने पक्षाकडे तरुणांचा कल वाढेल, कारण गेल्या दोन वर्षात अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
दुसरीकडे कन्हैया कुमारच्या कॉंग्रेस एन्ट्रीबाबत बिहार कॉंग्रेसचा कोणताही नेता या संदर्भात स्पष्ट पणे बोलताना दिसत नाही. याचं कारण त्यांच्या प्रवेशामुळं बिहारच्या जुन्या कॉंग्रेस नेत्यांमध्ये फारशी उत्सुकता पाहायला मिळत नाही.
कन्हैया कुमार आपल्या पक्षात नाराज आहेत का?
कन्हैया कुमारचे त्याच्याच पक्षाच्या बड्या नेत्यांशी फारसे चांगले संबंध नसल्याची चर्चा आहे. हैदराबाद येथे झालेल्या सीपीआयच्या बैठकीत त्यांच्यावर बेशिस्तीचा आरोप करत त्यांच्याविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या घटनेनंतर कन्हैया कुमारने पक्षातील त्यांची खोली देखील खाली केल्याचं बोललं जातंय. कन्हैयाची कमी वयातील लोकप्रियता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना खटकते. म्हणून कन्हैया कुमार आणि पक्षातील नेत्यांमध्ये फारसं पटत नसल्याचं बोललं जात आहे.
बिहारच्या राजकारणातील बड्या युवा चेहऱ्यापैकी एक...
सध्या बिहारच्या राजकारणातील तीन युवा चेहऱ्यांची मोठी चर्चा पाहायला मिळते. त्यामध्ये तेजस्वी यादव, चिराग पासवान आणि कन्हैया कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. जेएनयू मध्ये त्यांना अटक झाल्यानंतर देश आणि जगाच्या माध्यमांची कन्हैया कुमार हेडलाईनवर होते. कन्हैया कुमारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण बिहारमध्ये मोठी रॅली काढली होती. या रॅलीला त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता.