ईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात- पाटील

Update: 2021-09-30 03:59 GMT

अहमदनगर : ईडी आणि सीबीआयला कायद्याने अनेक अधिकार मिळाल्याने ते कुणालाही अटक करू शकतात त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत ते महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना ओढून- ताणून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनंतर पत्रकारांशी बोलत होते.

भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले आहे. दरम्यान ईडीच्या कारवाई नंतर जिल्ह्यात आणि राज्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. याबाबत पाटील यांना विचारले असता, ईडीने सूडाच्या भावनेतून काम करायला सुरुवात केली आहे, ओढून-ताणून प्रत्येक नेत्यांचा संबंध कोणत्यातरी प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची अत्यंत चांगली परिस्थिती असून, जिल्ह्यातील नेत्या आणि कार्यकर्त्यांशी भेटून राष्ट्रवादीला अधिक मजबूत करण्यासाठीचा आजचा दौरा आहे, सोबतच भविष्यात पारनेर मतदार संघात लोकसभेची जागा राष्ट्रवादी जिंकू शकेल असं पाटील यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News