२६ खासदार असलेल्या गुजरातचे मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्राचे शरद पवार पंतप्रधान का होऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. ४-५ खासदारांच्या जिवावर मोठी स्वप्न आपण पाहत नाही, असे शरद पवार यांनी यापूर्वी पंतप्रधान पदासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते. पण आता पुन्हा एकदा शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का, अशी चर्चा सुरू झाली आहे....
शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का या शक्यतेचा विचार करताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात...
मोदी विरोधी निर्णायक रणनीती
शरद पवार पंतप्रधान व्हायचे असतील तर सगळ्यात आधी नरेंद्र मोदी यांच्या सत्तेमधून बाहेर करावे लागेल. त्यासाठी एक भक्कम आणि निर्णायक रणनीती आखावी लागेल. युपीएची रणनीती ही मोदींना सत्तेबाहेर कसे घालवायचे ही असेल....आणि ही रणनीती जर शरद पवार यांच्या रणनीतीवर बनली तरच पंतप्रधान पदावर शरद पवार यांचा दावा जास्त भक्कम असू शकेल.
शरद पवार यांचे वाढते वय
यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा...शरद पवार यांनी १२ डिसेंबरला वयाची ८१ वर्ष पूर्ण केली आहेत. शरद पवारांसारख्या असामान्य नेत्याचा विचार केला तर या वयातही त्यांचा सहज असलेला वावर पंतप्रधान पदाच्या आड येईल असे वाटत नाही. सध्याच्या परिस्थितीत त्यांचे राष्ट्रीय राजकारणात वाढत असलेले महत्त्व, याचा विचार केला तर वयाचा मुद्दा निकाली निघतो.. जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ७९ वर्षांचे आहेत.
प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी
वयाचा मुद्दा बाजूला ठेवला तर कमी खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवावर पंतप्रधान होणे शक्य नाही याची जाणीव खुद्द शरद पवार यांना आहे. पण महाराष्ट्रात जो महाविकास आघाडीचा अभूतपूर्व प्रयोग झाला त्याची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर व्हावी यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. केवळ ४६ खासदार असलेल्या जनता दलाचे एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान पद मिळाले होते, हा इतिहास आहे. २०२४च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही तर पुन्हा एकदा आघाडीचे राज्य येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होते आहे. या आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व असेल हे देखील स्पष्ट आहे, त्यामुळे ममता बॅनर्जी आपली महत्त्वाकांक्षा बोलून दाखवत नसल्या तरी त्यांना पंतप्रधानपद खुणावत असल्याचे त्या आपल्या कृतींमधून दाखवून देत आहेत. सध्या नेतृत्व कोण करेल हा प्रश्न नाही, ते नंतर ठरवता येईल, अशी भूमिका शरद पवार, ममता बॅनर्जी मांडत आहेत. राष्ट्रीय आघाडी झाली आणि सत्ता स्थापनेचे संधी मिळाली तर मात्र पंतप्रधान पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे महत्त्वाचे आहे.
काँग्रेसची भूमिका महत्त्वाची
शरद पवार यांना पंतप्रधान करायचे असेल तर यात काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरु शकते. आपल्या राजकीय कारकिर्दीची तब्बल ४ दशकं काँग्रेसमध्ये काढलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी अनेकवेळा आली होती, पण ती पक्षाने मिळू दिली नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे २०२४मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व पवारांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद देईल का, भाजपविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसचे स्थान काय असेल, राहुल गांधी आपल्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेचा त्याग करतील का, असे अनेक प्रश्न आहेत.
शिवसेना शरद पवारांना साथ देणार का?
महाराष्ट्रात शरद पवार यांना आपले मार्गदर्शक म्हणणारे उद्धव ठाकरे यांनाही आता राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसशिवाय आघाडी शक्य नाही, अशी भूमिका मांडून शिवसेनेने काँग्रेसच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्या केंद्रात काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले तर शिवसेना राहुल गांधी यांच्या नावाऐवजी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरणार का, की काँग्रेसशी हातमिळवणी करुन आपल्या पदरात मोठे काही पाडून घेणार हे आता सांगणे कठीण आहे.
शरद पवारांएवढा एकही ज्येष्ठ राजकारणी सध्या एक्टिव्ह नाही
शरद पवारांच्या दृष्टीने सकारात्मक गोष्ट म्हणजे, अनेक पक्षांची मोट बांधून सत्ता स्थापन करायची आणि सरकार चालवायचे तर अनुभवी आणि सगळ्या पक्षांना आदर वाटेल असे नेतृत्व असणे, ही भाजपविरोधी आघाडीची गरज आहे. ममता बॅनर्जी यांचा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावरील राग लक्षात घेतला तर २०२४च्या निवडणुकीत आकड्यांचे गणित बसत नसेल तर ममता बॅनर्जी यांच्यासारख्या आक्रमक व्यक्तीपेक्षा शरद पवार चालतील असा विचार भाजपेतर पक्ष करु शकतात, अशीही एक शक्यता आहे.
शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात यावर, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे म्हणणे वेगळे आहे. पवार आणि पंतप्रधान पदाच्यामध्ये त्यांची विश्वासार्हता येते, असे त्यांचे म्हणणे आहे. "पंतप्रधान होण्यासाठी एक आकडा आवश्यक असतो. ज्यांच्याकडे आकडा नव्हता ते पंतप्रधान झाले पण औटघटकेचे पंतप्रधान ठरले. शरद पवार यांनी पूर्ण जरी प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातील ४८ च्या ४८ जागा जिंकून आणल्या तरी राष्ट्रीय पातळीवर त्या कमी पडतात. शरद पवारांनी ५ वर्षात ५ वेगवेगळ्या लोकांना मदत केली. जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते, त्या सरकारमधून बाहेर पडले आणि सरकार पाडले. निवडणुकांनंतर जेव्हा भाजप-शिवसेना एकत्र आले, पण शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला तेव्हा शिवसेनेला बाजूला करुन भाजपला आवाजी मतदानात समर्थन दिले. त्यानंतर २०१९मध्ये भाजपविरोधात शिवसेनेला साथ देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांना धक्के दिले आहे, त्यामुळे केंद्रीय नेतृत्व पवारांवर कसा विश्वास ठेवणार. त्यामुळे शरद पवार सगळ्यांना हवे आहेत ते मदतीसाठी पंतप्रधानपदासाठी नाही." असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात का, या प्रश्नाचे उत्तर थेट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सध्या तरी देणे शक्य नाही, पण जर तरच्या राजकारणाचा विचार केला तर या देशात काहीही अशक्य नाही, एवढे मात्र नक्की.....