केंद्र सरकारने ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले होते का?
Aryan Kahn ला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणांनी कारवाया केल्या, त्या पाहता राज्य सरकार पाडण्याचे हे षडयंत्र आहे का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.;
आर्यन खान निर्दोष असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता आणि आता त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे, कारण NCBने आर्यन खानला निर्दोष मुक्त केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCBने २ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली आणि संपूर्ण देशभरात खळबळ उडाली....कारण आर्यन खानवर ड्रग्जप्रकऱणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्याविरोधात एका स्वरुपाची मोहीमच सुरू झाल्याचे चित्र होते. NCBच्या या कारवाईवर सर्वप्रथम आक्षेप घेतला तो राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी....समीर वानखेडे यांनी चुकीच्या पद्धतीने आर्यन खानला गोवल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर काही महिन्यातच सत्य समोर आले आणि आर्यन खानसह ६ जणांची मुक्तता झाली.
NCB ही केंद्रीय यंत्रणा असल्याने यामागे केंद्राची फूस असल्याचा आरोप तेव्हा झाला. त्यातच जात प्रमाणपत्रापासून ते आपला धर्म लपवण्यापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर आरोप होत असताना काही भाजप नेते त्यांचे समर्थन करत होते.
यासर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील सरकार पाडण्याचा डाव होता का अशीही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सत्यमेव जयते...असे सांगत आर्यन खानच नाही तर नवाब मलिक, अनिल देशमुख तसेच इतर नेत्यांवर होणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया हा याच दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप केला आहे.
सुशांत सिंग प्रकरणापासून आपण विचार केला तर CBI, NCB यांनी केलेल्या कारवायांमधून गेल्या दोन वर्षात काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकार, इथली पोलीस यंत्रणा यांच्यावर गंभीर आरोप करण्याचे कारस्थान होते का, असाही सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. दुसरीकडे गेल्या काही महिन्यात ED ने थेट पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली. तिकडे अनिल देशमुख यांना अटक करुन अनेक महिने उलटून गेले तरी त्यांच्याविरोधात CBIला काही सापडत नाहीये. ज्या सचिन वाझेला अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून तपास यंत्रणांनी बोट ठेवले तोच अचानक आता देशमुखांविरोधात माफीचा साक्षीदार बनला आहे. नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या कारणावररुन तुरुंगात टाकण्यात आले आहे. दरम्यान या आर्यन खानला गोवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
एकीकडे या सर्व कारवाया सुरू असताना भाजप नेते सरकार पडण्याच्या नवनवीन तारखा देत आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या वापरातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा आहे. पण एवढ्या हल्ल्यांनंतरही ठाकरे सरकार स्थिर आहे, हेच सिद्ध होते आहे.