विरोधकांच्या जिभाच कापून घटनेच्या, स्वातंत्र्याच्या चितेवर ठेवल्या आहेत, सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल
संसदेने असंसदिय शब्दांची यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यावरून देशात गदारोळ माजला आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.;
संसदेने असंसदीय शब्दांची यादी प्रसिध्द केली. मात्र त्यामध्ये सरकारवर टीका करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांवर बंदी घातली आहे. त्यावरून शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली आहे.
शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात भारतीय संसद अधित सभ्य आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असल्याचा टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सरकारने असंसदीय शब्दांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये जयचंद, शकुनी, जुमलाजीवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरूष, कालाबाजारी असे मजबूत शब्दभांडारा संसदेत उधळण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यावरून टीका करत म्हटले आहे की, सत्ताधारी बाकावरील सदस्य गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणे वागत आहेत. तर विरोधी बाकावरील सदस्यांनी आपल्या अमोघ शब्दशस्रांचा वापर करू नये, यासाठी सगळा डाव रचण्यात आल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
लोकसभेच्या अध्यक्षांनी यावर स्पष्टीकरण देतांना सांगितले की, संसद सचिवालयाकडून कोणत्याही शब्दावर बंदी आणली नाही. मात्र असंसदीय शब्द कामकाजातून काढून टाकण्यात येतील. याचा अर्थ संसद सदस्यांचा बोलण्याचा अधिकार मान्य करायचा आणि दुसरीकडे कोणते शब्द वापरायचे याचा आदेश द्यायचा, असा प्रकार असल्याचे मत सामनातून व्यक्त केले आहे.
पुढे सामनात म्हटले आहे की, शब्द हे संसदीय संघर्षाचे वैभव आहे. त्यामध्ये असंसदीय काय आहे? भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार नाही तर नेमकं काय म्हणायचं? तानाशाह म्हणजे हुकूमशहाला दुसरी काय उपमा द्यायची? महाराष्ट्रात गद्दारीचा प्रयोग घडवून आणला आणि लोकशाहीचा गळा घोटला. मग या तानाशाहीवर व्यक्त होताना संसदेत आवाज उठवताना सदस्यांनी कसं व्यक्त व्हायचं असा सवाल करत विरोधकांच्या जिभाच कापून घटनेच्या, स्वातंत्र्याच्या चितेवर ठेवल्या असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून केली.
संसदेत विरोधकांनी सभ्य, सुसंस्कृत भाषेचा वापर करायचा आणि संसदेच्या बाहेर सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी असंसदीय शब्दांचे फवारे उडवायचे हे चालेल काय? मग लावायचाच असेल तर संसदेचा नियम बाहेरही लावा आणि देशाच्या जीभेची टाळेबंदी केली असं एकदाच जाहीर करून टाका, असा संताप या अग्रलेखात व्यक्त केला आहे.
आम्ही आणीबाणीविरोधात लढतो, असं भाजप नेहमी सांगणाऱ्यांनीच लोकशाही, स्वातंत्र्य आणि संसदीय कार्यावर असा घाव घालावा का? असा सवाल करत दरवर्षी आणीबीणीचे वर्षश्राध्द घालता तसे एकदाच संसदेच्या सध्याच्या अवस्थेचेही तेरावे घालून मोकळे व्हा, अशी टीका सामनातून केली.
असंसदीय शब्दांचे वर्णन राहुल गांधी यांनी नव्या भारताचा शब्दकोश असे केले आहे. तर तृणमुलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी माझ्यावर कारवाई करा, मला निलंबित करा, मी हे शब्द वापरत राहीन, मी लोकशाहीसाठी लढणार आहे, असं म्हटलं आहे. तर समाजात अजूनही जयचंद आणि शकुनी आहेत. त्यास आपली समाजव्यवस्था जबाबदार असल्याचे म्हणत जयचंद आणि शकुनीचे भाले भाजपला का टोचावेत? असा टोला लगावला.
पुढे नव्या संसदेवरच्या राजमुद्रेवरून टोला लगावला आहे. संसदेची अवस्था मुबधिरासारखी आणि दिव्यांगासारखी झाली असल्याचे म्हटले आहे. तर सर्वोच्च न्यायालयात आजही न्यायाचा थोडाफार अंश जिवंत आहे.संसदेवरील गुरगुरणाऱ्या सिंहाची हिंमत जनतेच्या मनगटात आहे. तर संसद ही देशाची सर्वात मोठी न्यायपालिका आहे. त्यामुळे संसदेचा गौरव करण योग्यच. पण तो सन्मान आज राहिला आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
पुढे अग्रलेखाच्या उत्तरार्धात ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे उदाहरण दिले हे. तसेच लोकशाही ही अशोकस्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखी असायला हवी. पण सध्या राज्यकर्ते गुरगुरत आहेत. आणि संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. यावर हरिशंकर परसाई यांना कोट करून सामनात म्हटले आहे की, हुकूमशहा डरपोक माणूस असतो. चार गाढवं एकत्र चरत असली तरी त्यांना भीती वाटते की आपल्याविरोधात कटकारस्थान चालले आहे. आजचे चित्र यापेक्षा वेगळे नसल्याची टीकाही सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.