जळगाव जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. ते भाजपच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यानुसार जळगाव जिल्हा बँकेच्या सर्व 21 जागांसाठी भाजप उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याच्या हितासाठी आमची एकत्र येण्याची भूमिका होती मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून वेगळाच सूर येत असल्याने आम्ही सर्व 21 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरून ठेवणार आहे असं महाजन यांनी म्हटले आहे.
मात्र, भाजपच्या या निर्णयामुळे जिल्हा बँक निवडणुकीत सासरे एकनाथ खडसे विरुद्ध सून रक्षा खडसे अशी लढत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राजकिय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पक्षाने आदेश दिला तर जो मतदारसंघ देतील तो लढवू असं भाजप खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान जळगाव जिल्हा बँकेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार का? या पत्रकारांच्या प्रश्नांवर महाजन यांनी चेंडू महाविकास आघाडीकडे टोलवला आहे, खरं तर मागच्या दोन महिन्यात त्यांनी 2 ते 3 बैठका घेतल्या मात्र, त्यांच्याकडून अजून ठोस असा कोणताही निर्णय घेतला जात नाही त्यामुळे पुढे जे काही होईल ते होईल पण भाजप स्वबळावर लढण्याची तयारी ठेवणार आहे असं महाजन यांनी म्हटले आहे.