विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास होऊच शकत नाही, मी केवळ स्लोगन देणार नाही तर काम करणारा नेता आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांच्या प्रस्तावावरील उत्तरात सांगितले. विरोधकांचा आणि सत्ताधारीचा एकत्र विदर्भ आणि मराठवाडा विकासावरील प्रस्तावावर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित उत्तर दिले.
विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत असं म्हणत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत कालबद्ध कार्यक्रम आखून विदर्भाचा विकास करूया असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील उत्तरात केलं.
विदर्भाचं आणि माझं नातं गेल्या आठ ते दहा वर्षांपासून जवळचं आहे. गडचिरोलीचा पालकमंत्री असताना मला येथून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विदर्भाचे प्रश्न, समस्या कळल्या. या विदर्भासंदर्भात एक आपुलकीचं नातं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भातील काही ठळक मुद्दे मांडले आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील अविकसित महाराष्ट्राचा झपाट्याने विकास होण्यासाठी, अनुषेश भरून काढण्यासाठी अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले.
सत्ताधाऱ्यांनीही अनेक मुद्दे मांडले. म्हणून आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण माहित आहे. येथल्या प्रश्नांना जवळून पाहिल्यामुळे यामध्ये काम कताना फायदा होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विदर्भाकडे मुख्यमंत्री पद नसतानासुद्धा महत्त्वाची खाती अनेकांकडे होती. खऱ्या अर्थाने अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भाच्या भौगोलिक दृष्टीकोनातून न्याय देता आला असता, असं शिंदे म्हणाले. युतीचं सरकार असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. त्यावेळी विदर्भ, मराठवाडा नाही त-र राज्यातील अनेक सिंचन प्रकल्प राबवले. आपल्याला सगळ्यांना मिळून प्रकल्पांना पुढे न्यायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा झाली तेव्हा विरोधकांनी बहिष्कार घातला. विरोधकांनी पायऱ्यांवर प्रतिसभा चालवली. विदर्भबाबतीत सर्वांनाच संवेदना असली पाहिजे. विदर्भाला काहीतरी दिलं पाहिजे अशी आपली भावना असली पाहिजे. आपण एकत्र येऊन कालबद्ध पावलं टाकण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे.
सरकार म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्णपणे पाळणार आहोत. त्यातून ठोस निर्णय घ्यायचे. नागपूर ही केवळ राज्याची उपराजधानी नाही. नागपूर प्रगती आणि विकासात योगदान देणारा जिल्हा म्हणून नवीन ओळख आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
देशासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा तसा महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्त्वाचा आहे. त्यामुळे सहा महिन्यात विविध निर्णय घेताना अविकसित प्रदेशाचा विकास केंद्रस्थानी मानून काम करतोय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15000 रुपये बोनस देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली यावेळी त्यांनी बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असंही स्पष्ट केलं.
स्वाधार साठी योजना आता ओबीसीसाठी शैक्षणिक शुल्क आणि भोजन शुल्क थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा करणार असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात सांगितले.