पिगॅसस स्पायवेअरद्वारे देशातील काही मुख्य राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेल्याचा गौप्यस्फोट द वायरने केला आहे. यानंतर मोदी सरकारची कोंडी झाली आहे. आता याच संकटात केंद्र सरकारला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर दिला आहे. या स्पायवेअरद्वारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव आणि आणखी एक मंत्री यांच्यावर पाळत ठेवली गेल्याचा दावा कऱण्यात आला आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार उघड झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी याच मुद्द्यावरुन मोदी सरकारने याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. "पेगॅसस स्पायवेअर ही कंपनी त्यांना ग्राहकांकडून मिळणाऱ्या कंत्राटानुसार काम करते. त्यामुळे भारतातील ऑपरेशन पिगॅसससाठी या कंपनीला कुणी कंत्राट दिले आणि पैसे हा मोठा प्रश्न आहे. यामागे जर भारत सरकार नाही तर मग कोण आहे ? देशातील जनतेला सत्य सांगणं हे सरकारचे कर्तव्य आहे," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
हे स्पायवेअर तयार करणाऱ्या इस्त्रायली कंपनी NSOने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमची कंपनी कोणत्याही खासगी संस्थेसाठी किंवा व्यक्तीसाठी हेरगिरी करत नाही. आमचे ग्राहक हे केवळ अधिकृत सरकार असतात. पण जे नंबर लिक झाले आहेत, ते हॅक करण्यात आले नव्हते, असा दावाही या कंपनीने केला आहे.
केंद्र सरकारतर्फे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सोमवारी निवेदन दिले आहे. सरकारने हेरगिरीचे सर्व आऱोप फेटाळले आहेत. तसेच अधिवेशनाच्या तोंडावर असे वृत्त प्रसिद्ध होणे हा योगायोग नाही, असे सांगितले आहे. तसेच सरकार यावर संसदेत चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधकांनी त्यासाठी योग्य प्रक्रियेद्वारे मागणी करावी अशी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली आहे.#PegasusSnoopgate- सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल