विहीरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान
भाजपच्या संसदीय बोर्डातून वगळल्यानंतर नितीन गडकरी वेगळा विचार करणार का? अशी चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.;
गेल्या अनेक दिवसांपासून नितीन गडकरी यांना भाजपमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यातच नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय बोर्डातून वगळण्यात आले. त्यामुळे नितीन गडकरी वेगळा विचार करणार का? अशी चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर नितीन गडकरी यांनी नागपूर येथे बोलत असताना मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, जेव्हा तुम्हाला यश मिळते. तेव्हा त्याचा आनंद तुम्हाला एकट्याला मिळत असेल तर ते यश अर्थहीन आहे. मात्र तुमच्या यशामुळे तुमच्या सोबतच्या लोकांनाही आनंद होत असेल तर ते खरे यश असते. ते व्यवसाय, राजकारण आणि सामाजिक कार्य यामध्ये सारखे असते. त्यामुळे दिवस चांगले असू की वाईट एखाद्या व्यक्तीचा हात पकडला तर तो पकडून ठेवा. परिस्थितीनुसार सोडू नका, असा सल्ला दिला.
तसेच पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. यामध्ये डॉ. श्रीकांत जिचकर यांनी नितीन गडकरी यांना तुम्ही काँग्रेसमध्ये या. तुम्हाला उज्वल भविष्य असल्याचे सांगितले. मात्र तुम्ही सध्या चुकीच्या पक्षात असल्याचे म्हटले. त्यावरून डॉ. जिचकर यांना उत्तर देतांना नितीन गडकरी म्हणाले की, मी विहीरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही.
त्यावरून डॉ. जिचकर नितीन गडकरी यांना म्हणाले की, तुमच्या पक्षाला काही भविष्य नाही. त्यावर नितीन गडकरी म्हणाले, नसेल तर नसू द्या. यानंतर नितीन गडकरी यांनी रिचर्ड निक्सन यांच्या पुस्तकातील एक वाक्य सांगितले. ज्यामध्ये म्हटले होते की, माणूस युध्दभुमीवर हारला तर तो त्याचा पराभव नसतो. मात्र त्याचा आत्मविश्वास हारला तर तो हारतो, अशा शब्दात गडकरी यांनी डॉ. जिचकर यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी गळ घातल्याची आठवण सांगितली.